निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे गलिच्छ राजकारण करू नका ! – वैद्य उदय धुरी, मुंबई प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
नेरूळ : देशातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना पुरो(अधो)गामी आणि विरोधक यांना आतंकवादी वाटतात आणि हाच न्याय जर नक्षलवाद्यांना लावायचा म्हटला तर सर्वांच्या तोंडाला दातखीळ बसते. निवणुकीच्या तोंडावर हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे हे गलिच्छ राजकारण करू नका. बहुसंख्य हिंदू जनता यास तोंड देण्यास समर्थ आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी केले. नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘देशातील विरोधी लोकांनी आणि विशेषतः प्रसारमाध्यमांनी एकमेकांशी हातमिळवणी केल्याप्रमाणे काही दिवसांपासून सनातन संस्था आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यावर बंदी आणण्यासाठी जे काही षड्यंत्र रचले आहे, ते कधीही सफल होणार नाही; कारण खोटे दीर्घकाळ टिकत नाही. प्रसारमाध्यमांचा खोटेपणा हा सर्वसामान्य जनतेला कळून चुकला आहे आणि अशा या एकांगी खोट्या प्रचारावर लवकरच सत्याचा पडदा पडणार कारण सनातन सत्याची बाजू मांडते त्यामुळे ईश्वर आमच्यासमवेत आहे.’’
या आंदोलनात नवी मुंबईतील हिंदु राष्ट्र सेना, गोरक्षा समिती यांसह सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाचे पूर्ण ध्वनीमुद्रण पोलिसांनी केले; तसेच शेवटी संस्थेचे काय काय उपक्रम चालतात, हे जाणून घेतले.
क्षणचित्रे
१. एका राष्ट्रप्रेमीने ‘आता पुढे काय करायचे ?’, असे विचारून त्याचा संपर्क क्रमांक दिला आणि समितीच्या कार्यात येण्याची इच्छा व्यक्त केली.
२. अवघ्या एका घंट्यात १०० हिंदी साप्ताहिक सनातन प्रभात आणि २५० सनातनवरील बंदीविरोधी पत्रकांचे वितरण करण्यात आले; त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
मुलुंड
मुलुंड : ९ सप्टेंबर या दिवशी मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला योग वेदांत समितीचे श्री. महादेव चाळके, साई लीला मित्र मंडळाचे श्री. सचिन घाग, शिवसेनेचे कार्यकर्ता श्री. गणेश पाटील, सनातन संस्थेचे श्री. राजू भोगले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी संबोधित केले.
क्षणचित्र : जिथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन होते, त्याचाच बाजूला त्या वेळी काँग्रेस आणि मनसे यांनी ‘भारत बंद’विषयी मोर्चा चालू असूनदेखील मुलुंड पोलीसांनी चांगले सहकार्य केले.
डोंबिवली
सनातन संस्थेवर केलेले आरोप पाण्यावरील बुडबुड्यासारखे ! – हरीश यादव, योग वेदांत समिती
डोंबिवली : सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणारे कधीही धर्म आणि राष्ट्र हिताविषयी बोलतांना दिसत नाहीत. सनातन संस्था ही राष्ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य करते. लोकांना धर्मशिक्षण देऊन साधना करायला सांगते, तसेच ते राजकीय नेत्यांचे, पुरो(अधो)गाम्यांचे भ्रष्टाचाराचे घोटाळे उघड करत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत. सनातन संस्थेवर केलेले आरोप बिनबुडाचे असून पाण्यावरील बुडबुड्यासारखे ते हवेत विरून जातील, असे सांगत सनातन संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन योग वेदांत समितीचे श्री. हरीश यादव यांनी केले.
डोंबिवली पूर्व येथील इंदिरा गांधी चौक येथे ११ सप्टेंबर या दिवशी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे श्री. नंदू जोशी, रा.स्व. संघाचे श्री. बकुल शहा, प.पू. आसाराम बापू संप्रदायाचे अन् सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी पुरोगामी संघटना आणि खोटे वृत्त प्रसारित करणार्या प्रसिद्घीमाध्यमांचा हातात फलक घेऊन आणि घोषणा देऊन निषेध करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. प्रतिमा शिंपी यांनी विषय मांडला.
हिंदुत्वनिष्ठांना अमानुष मारहाण करून गुन्हा मान्य करण्यासाठी दबाव आणला जात आहे, यामागचा बोलविता धनी कोण ? – विजय ठाकरे, पत्रकार
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदु देव, देश आणि धर्म यांचे कार्य केले तर ते भगवे आतंकवादी आहेत, असे पुरो(अधो)गामी आणि प्रसिद्घीमाध्यमे म्हणतात. हिंदुत्वनिष्ठांचा तपास यंत्रणांकडून अनन्वित छळ केला जातो, तर देशावर आक्रमण करून निरपराध नागरिकांचा बळी घेणार्या कसाबला बिर्यानी दिली जाते. अटक केलेल्या हिंदुत्वनिष्ठांना तपास अधिकारी अमानुष मारहाण करून त्यांच्यावर गुन्हा मान्य (कबूल) करण्यासाठी दबाव आणत आहेत यामागचा बोलविता धनी कोण आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
क्षणचित्रे
१. प.पू. आसारामबापूंच्या तीन साधिकांनी उस्फूर्तपणे विषय मांडला.
२. लोक विषय ऐकून स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झालेे.
३. सनातन सत्यदर्शन अंक वितरण करतांना ‘प्रसिद्घीमाध्यमे किती विकाऊ आहेत, हे आम्हाला माहिती आहे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
४. सनातन सत्यदर्शन हा सनातन विशेषांक एकाने हातात घेताच ‘आमचा तुम्हाला पाठिंबा आहे !’ असे उत्स्फूर्तपणे सांगितले.
५. आंदोलन पहाणार्या काही नागरिकांनी विषय समजल्यावर आंदोलनात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.