भाजपच्या या राज्यातील प्रशासनाप्रमाणे असा निर्णय भाजपच्या अन्य राज्यांतील प्रशासन का घेत नाहीत ?
गुरुग्राम (हरियाणा) : गेल्या आठवड्यापासून येथील शीतला कॉलनीमध्ये असणार्या मशिदीवरील भोंग्यामुळे चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने या मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. ३ मजल्यांच्या इमारतीतील सदनिकेमध्ये मशीद बनवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या मशिदीवरील भोंग्यांवरून होणार्या ध्वनीप्रदूषणाविषयी तक्रार केली होती. त्यानंतर येथे तणाव निर्माण झाल्याने येथील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.
१. हिंदु संघटनांचे म्हणणे आहे की, घराचा उपयोग मशीद म्हणून केला जात आहे आणि हे नियमांचे उल्लंघन आहे. येथे शेकडो लोक येतात आणि भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो.
२. काही मासांपूर्वी येथील सेक्टर ५३ मध्ये सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याचाही विरोध करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने केवळ ३७ ठिकाणी नमाजपठण करण्याची अनुमती दिली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात