आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन
जनागाम (तेलंगण) : येथील बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. एम्. वीरेंद्र यांनी ११ सप्टेंबर या दिवशी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांसाठी आयोजित केलेल्या एका शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन करण्यात आले. यात २५ पदाधिकारी सहभागी झाले होते. तसेच विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष आणि भाजपचे नगराध्यक्षही यात सहभागी झाले होते. या वेळी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व, उत्सवामध्ये होणार्या अयोग्य कृती, त्या रोखण्यासाठीचे उपाय आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने गणेशोत्सव मंडळांचा सहभाग कसा असू शकतो, यांविषयी समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात गटचर्चाही घेण्यात आली. त्यातून हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठीच्या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. याच दिवशी निजामाबाद (इंदूर) जिल्ह्यातील बोधन शहरामध्येही अशा प्रकारचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे आणि येथील भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष यांच्यासह ६० जण उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे इंदूर जिल्हा समन्वयक श्री. मेला सुबोध यांनी मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या गटचर्चेत मंडळांच्या पदाधिकार्यांनी ‘मंडपामध्ये मद्यबंदी आणि चित्रपटगीते लावण्यावर बंदी घालू’, असे सांगितले. तसेच ‘धर्मशिक्षण देणारे उपक्रम राबवू’, असेही म्हटले.