दरभंगा (बिहार) : आजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे. ते प्रभु श्रीरामाची पत्नी सीतादेवी यांचे पिता होते. राजा जनक यांनी मिथिला नगरीवर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग असे तीन युगे राज्य केले. जनक हे राजा असूनही त्यांंना ऋषीपद प्राप्त झाले. आजच्या लोकशाहीत सरकारे ५ वर्षेसुद्धा टिकत नाहीत. या पार्श्वभूमीवर जनक राजाचे महत्त्व अधोरेखित होते. आजच्या लोकशाहीत एकाही शासनकर्त्यानेे ऋषीपद प्राप्त केलेलेे नाही; कारण लोकशाहीत धर्माने राज्य करण्याची परंपरा संपली आहे. यासाठी धर्माधारित शासनकर्ते असलेली राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्याची आज आवश्यकता आहे. मिथिला नगरीतील युवकांकडून या कार्यासाठीच्या योगदानाची हिंदु समाजाला अपेक्षा आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त हिंदु राष्ट्र संपर्क अभियानाच्या अंतर्गत दरभंगा जिल्ह्यामध्ये सिमरी, पुताई, मानीगाछी आणि अहियारी येथे हिंदु राष्ट्र जागृती बैठकांचे आयोजन केले होते. या वेळी समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी हेही उपस्थित होते.