भारताच्या लोकशाही पद्धतीत त्रुटी असणे, हे इंग्रजांचे मोठे षड्यंत्र ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) : ब्रिटनमध्ये धर्माविषयीचे कायदे चर्चकडून बनवले जातात, तर राजकीय स्वरूपातील कायदे संसदेत बनवले जातात. अशी पद्धत भारतात का बनवण्यात आली नाही ? तसेच ब्रिटनमध्ये केवळ दोनच पक्ष आहेत, तर भारतात अनेक पक्ष आहेत. हेही ब्रिटिशांचे एक षड्यंत्र होते. अनेक पक्षांमुळे भारतियांमध्ये फूट पडली आहे. एकूणच भारताच्या लोकशाहीच्या पद्धतीत त्रुटी असणे, हे इंग्रजांचे मोठे षड्यंत्र होते, हे लक्षात येते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ग्वॉल्हेर उच्च न्यायलयातील बार असोसिएशनमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात केले. या व्याख्यानाचे आयोजन बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता अनिल मिश्रा, सचिव अधिवक्ता धीरेन पाल, सर्व पदाधिकारी अन् कार्यकारिणी सदस्य, अधिवक्ता युवराजसिंह भदौरिया, अधिवक्ता अमित चौहान यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानात केले. याचा लाभ ४० अधिवक्त्यांनी घेतला.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मांडलेली सूत्रे
१. भारतात आपल्या देशाने बनवलेले कायदे कुठे अस्तित्वात आहेत ? भारतीय दंड विधान हे वर्ष १८६० मधील आहे. यावरून हे स्पष्ट होते. हे कायदे क्रांतीकारकांना शिक्षा देण्यासाठी बनवण्यात आले होते. आजही हेच कायदे देशात चालू आहेत. राज्यघटनेत ज्या प्रमाणे अल्पसंख्यांकांना सुविधा देण्यात आल्या आहेत, तशा बहुसंख्यांकांना देण्यात आलेल्या नाहीत. हा भेदभाव का ? बहुसंख्यांकांनाही संरक्षण आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत.
२. वर्ष १९५० मध्ये राज्यघटनेत ‘धर्मनिरपेक्ष’ असा शब्द घालण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता. ‘लोकांना विश्वासात घेतल्याविना हा शब्द घालणे योग्य होणार नाही’, असे त्यांनी म्हटले होते; मात्र वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेत हा शब्द घुसडला. हे लोकशाहीच्या विरोधात होते. कोणत्याही राजकीय पक्षाने याला विरोध केला नाही. आमची मागणी आहे की, लोकशाहीविरोधी पद्धतीने घालण्यात आलेला हा शब्द यातून काढला पाहिजे.
३. अधिवक्ता घालत असलेल्या काळ्या कोटाची आभा आधुनिक यंत्रांद्वारे पडताळली असता त्यातून नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिवक्त्यांनी ठरवले पाहिजे की, काळा कोट घालणे खरेच योग्य आहे का ?
अधिवक्ता अनिल मिश्रा यांच्या संपर्कातून व्याख्यानाचे आयोजन
ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता अनिल मिश्रा यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी भेट घेतली होती. त्या वेळी लोकशाहीमध्ये दुष्प्रवृत्तींमध्ये होणारी वाढ आणि हिंदु धर्मावरील आघात यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना ‘लव्ह जिहाद’विषयी माहिती दिली, तसेच ‘लव्ह जिहाद’ ग्रंथाविषयी सांगितले. हिंदु राष्ट्राची आवश्यकता, त्यासाठी अधिवक्ता कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात, याची माहिती दिली. यानंतर अधिवक्ता मिश्रा यांनी वरील व्याख्यानाचे आयोजन केले होते.