जयपूर येथील ‘ज्ञानम् फेस्टिव्हल’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग
जयपूर : सनातन संस्थेने समाजात जाऊन अध्यात्माचा प्रसार करतांना धर्मश्रद्धेचा प्रचार केला. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील नास्तिकतावादी विचारसरणीच्या संघटना आणि व्यक्ती यांचे धंदे बंद होऊ लागले. त्यामुळे आज ही मंडळी सनातन संस्थेला विरोध करत आहेत. सनातन संस्थेला विरोध करणार्या व्यक्ती नसून राष्ट्रविरोधी आणि हिंदु धर्मविरोधी शक्ती आहेत अन् केवळ हिंदु समाजाला अपकीर्त करण्याचे कारस्थान रचत आहेत. जेथे रामकृष्ण आदी अवतारांनाही विरोध झाला, तेथे सनातन संस्थेसारख्या लहानशा संघटनेला विरोध होणे स्वाभाविक आहे. सनातनला होणारा विरोध, हे सनातनच्या धर्मकार्याला मिळालेले प्रशस्तीपत्रकच आहे, असे आम्ही मानतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानम् फेस्टिव्हल’मधील ‘सनातन संस्था : परिचय, व्याख्या आणि विवाद’ या विषयावरील मुलाखतीमध्ये एका प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.
या वेळी त्यांनी सनातन संस्थेच्या धर्मकार्याला मिळालेला प्रतिसाद आणि सनातन संस्थेच्या कार्यामागील हेतू याविषयी विस्तारित माहिती दिली. ८ आणि ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित ज्ञानम् फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे धर्माचार्य, ज्योतिषी आणि आध्यात्मिक संस्था सहभागी झाल्या होत्या.