Menu Close

सध्याचे ९७ टक्के ‘संत’ प्रत्यक्षात अध्यात्मातील अधिकारी नाहीत : चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

जयपूर येथील ‘ज्ञानम् फेस्टिव्हल’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

जयपूर : आजकाल कथावाचक, संन्यास दीक्षा घेतलेले संन्यासी अथवा वैरागी, तसेच धर्माचार्य, महंत, महामंडलेश्‍वर आदी धर्मगुरु यांना लौकिक अर्थाने ‘संत’ संबोधले जात आहे. वस्तुतः ज्यांचा आध्यात्मिक अधिकार आहे, म्हणजेच ज्याने अध्यात्मात उन्नती केली आहे, अशा व्यक्तीला संतपद प्राप्त होत असते. त्यामुळे कथावाचक, संन्यास धारण केलेला संन्यासी किंवा धर्म उपदेशक हे सारे साधनामार्गी असले, तरी ते संत असतीलच, असे नाही. आज समाजामध्ये ज्यांना ‘संत’ म्हटले जात आहे, असे ९७ टक्के संत प्रत्यक्षात अध्यात्मातील अधिकारी नाहीत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानम् फेस्टिव्हल’मधील ’संत आणि साधू यांची योग्यता परिभाषित करण्याची आवश्यकता आहे का ?’ या परिसंवादामध्ये बोलत होते. ८ आणि ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित ज्ञानम् फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे धर्माचार्य, ज्योतिषी आणि आध्यात्मिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या परिसंवादामध्ये एका जिज्ञासूने विचारले की, ‘हिंदु धर्मामध्ये एवढ्या देवता असतांना हिंदु धर्माची अधोगती का झाली आहे ?’ त्याला उत्तर देतांना श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘धर्माला ग्लानी येते आणि धर्माची पुनर्स्थापना होते, हा आपला सनातन सिद्धांत आहे. आज धर्माला ग्लानी आलेली असली, तरी धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आपण कृतीशील होणे आवश्यक आहे. ही काळानुसार साधनाच आहे.’’

सनातन धर्मामध्ये संपूर्ण पृथ्वी हेच राष्ट्र मानले आहे ! – आनंद जाखोटिया

सनातन धर्मामध्ये राष्ट्रीय संकल्पना व्यापक आहे. मंत्रपुष्पांजलीमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण पृथ्वी एक राष्ट्र आहे. भागवत पुराणामध्ये राजा परीक्षित याचा उल्लेख ‘पृथ्वीचा सम्राट’ असा केला आहे. समुद्रमंथनाचा इतिहास स्कंद पुराणात सांगितला आहे. त्यात म्हटले आहे की, पृथ्वीचा राजा माधांता असतांना समुद्रमंथन झाले होते. यावरून लक्षात येईल की, सनातन दर्शनांमध्ये पृथ्वीलाच राष्ट्र मानण्याची पद्धत होती; म्हणूनच आपल्याकडे विश्‍वशांतीसाठी यज्ञ केले जातात. विश्‍वकल्याणासाठी प्रार्थना केल्या जातात आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे संपूर्ण विश्‍व हेच माझं कुटुंब आहे, ही भावना बाळगली जाते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे समन्वयक श्री.आनंद जाखोटिया यांनी केले. ते ‘सनातन अखंड भारत शाश्‍वत सत्य आहे का ?’ या परिसंवादात सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *