मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या ठिकाणी ४० हून अधिक हिंदुत्ववाद्यांची भेट !
कोल्हापूर : महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे पाहणी केल्यानंतर भाविकांना किमान सुविधाही दिलेल्या नाहीत, असे लक्षात येते. आपल्या संस्कृतीत प्रत्येक देवळासमोर एक कुंड असते; मात्र या ठिकाणी दुर्दैवाने कुंडावर अवैध बांधकाम करून शौचालय बांधण्यात आले आहे. हे बांधकाम हटवण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश असूनही ते बांधकाम हटवले जात नाही, हे दुर्दैवी आहे. आज हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या असून लवकरच बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. ८ मार्च या दिवशी श्री. प्रमोद मुतालिक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक तथा श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ता श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्यासह बजरंग दल, युवा सेना, श्री शिवप्रतिष्ठान, श्रीराम सेना, हिंदु एकता आंदोलन आणि शिवसेना यांच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाची पाहणी केली. त्या वेळी श्री. मुतालिक माध्यमांशी बोलत होते.
श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालयाच्या ठिकाणी बजरंग दलाचे श्री. संभाजी साळुंखे, श्री. महेश उरसाल, हिंदु एकताचे श्री. चंद्रकांत बराले, शिवसेनेचे सर्वश्री राजू यादव, संभाजी भोकरे, रघुनाथ टिपुगडे, सुधाकर सुतार, तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, तसेच सर्वश्री प्रमोद सावंत, संजय पौंडकर, अण्णा पोतदार, शिवाजीराव ससे, ज्ञानेश्वर अस्वले, हिंदुराव शेळके, रणजित आयरेकर, अनिल कुलकर्णी, जयकुमार खडके हे कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी ८ मार्च या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भेट दिली.
श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवा ! – सुनील घनवट, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती
श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून कुंड भाविकांसाठी तात्काळ खुले करावे, या मागणीसाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने आजपर्यंत निवेदने, आंदोलने, पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. तरीही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि जिल्हा प्रशासन यांनी याची कोणतीही नोंद घेतलेली नाही. हे अत्यंत निषधार्ह असून भाविकांच्या या मागणीची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन कधी घेणार, असा संतप्त प्रश्न श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांनी उपस्थित केला. या संदर्भात सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने लवकरच आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी श्री. अभय वर्तक म्हणाले की, या ठिकाणी कुंड दिसतच नाही, ही अत्यंत दयनीय स्थिती आहे. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या संदर्भातील हिंदुत्ववाद्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. या संदर्भात ९ मार्च या दिवशी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात