गुरुग्राम (हरियाणा) : येथील शीतला कॉलनीमध्ये एका इमारतीच्या सदनिकेला मशीद बनवण्यात आल्यावर शेजारील हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी त्याविरोधात तक्रार केल्यावर नगरपालिकेने त्याला सील केले आहे. त्यानंतर मुसलमान संघटना सील उघडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावर हिंदु संघटनांनी बैठक घेऊन सील उघडल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे, तसेच ‘कोणत्याही मुसलमानाला घर किंवा दुकान भाड्याने देऊ नये’, असा ठराव संमत केला आहे. या वेळी स्वामी विवेकानंद गिरी उपस्थित होते.
हिंदु संघटनांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी अशाच प्रकारे येथील ओम् विहार भागामध्ये घराला मशीद बनवण्यात आले होते. तेव्हा हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर ती मशीद बंद करण्यात आली होती. शीतला कॉलनी येथे मुसलमानांची केवळ ३० घरे आहेत; मात्र येथे शेकडो मुसलमान नमाज पठणासाठी येत होते. त्यामुळे हिंदूंना त्रास होत होता. (केवळ ३० घरे असतांना शेकडो मुसलमान तेथे कसे, कुठून आणि कशासाठी येत होते, याची चौकशी पोलिसांनी करायला हवी ! असा प्रकार देशात अन्यत्रही होतो का, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आणि त्यामागील कारण शोधले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात