मुंबई : तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवून सरकारने मुसलमान स्त्रियांच्या जीवनात स्वातंत्र्याची पहाट उगवेल, असे पाहिले. आता अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा शंखध्वनी करून राज्यकर्त्यांनी देशात हिंदू जनभावनेचाही सूर्योदय होईल हे पहावे. तलाकबंदी आणि तो गुन्हा ठरविण्याची वचनपूर्ती केलीत, तसेच ३ दशकांपासून बाजूला टाकलेले राम मंदिर निर्मितीचे आश्वासन गाठोड्यातून बाहेर काढा. अयोध्येतील राम मंदिराचाही अध्यादेश काढा आणि हिंदूंना दिलेल्या एका वचनाची तरी पूर्तता करा, असे सामनाने २० सप्टेंबरच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
तिहेरी तलाकविषयी कायदेशीर वचक बसणे आणि सामान्य मुसलमान स्त्रीची निदान या रूढीच्या बेडीतून मुक्तता करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने सरकारने उचललेले पाऊल चांगलेच आहे; फक्त तेवढ्यावरच थांबू नये. प्रभू रामांच्या मंदिर निर्मितीचा वनवास कायमच का आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. आता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात तुमचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. तरीही प्रभू श्रीरामांचा वनवास का संपत नाही ? न्यायालय निकाल द्यायचा तेव्हा देईल; पण तमाम हिंदूंच्या या श्रद्धेच्या आणि भावनेच्या प्रश्नावरही आता तोडगा काढा, हीदेखील देशभावना आहे. तलाकबंदीसाठी जो कणखरपणा आणि निग्रह दाखवला तसाच राम मंदिरप्रश्नीही दाखवा, असे यात पुढे म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात