सांगली : आदर्श गणेशोत्सव अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. अनेक ठिकाणी प्रवचने घेण्यात आली, तसेच काही मंडळांमध्ये धर्मशिक्षणविषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
१. कवठेमहांकाळ येथील राजा विद्यानगरचा या गणेशोत्सव मंडळाने हिंदु जनजागृती समितीने सिद्ध केलेले धर्मशिक्षणविषयी, तसेच राष्ट्रप्रेम जागृत करणारे फलक लावले होते.
२. सांगली येथील दैवज्ञ समाज संस्था यांच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने दैवज्ञ भवन येथे अथर्वशीर्षाची ११ आवर्तने सामूहिकरित्या म्हणण्यात आली. या उपक्रमात ५० हून अधिक भाविक सहभागी झाले होते. आवर्तनाच्या कालावधीत सनातन संस्थेच्या साधिका संस्कृत अध्यापिका सौ. संपदा अमित पाटणकर यांनी श्री गणेशविषयक संपूर्ण माहिती भाविकांना दिली. हा उपक्रम घेण्यात दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष श्री. अनिलराव गडकरी यांचा मोठा हातभार होता, तसेच श्री. विजयदादा कडणे यांचाही मोलाचा सहभाग होता. सौ. ज्योती गडकरी यांनी ‘‘आपण परत एकदा असा मोठा कार्यक्रम आयोजित करू’’, तर सौ. प्रिया गडकरी यांनी, ‘‘पुष्कळ महत्त्वाची आणि नवीन माहिती मिळाली’’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
३. शिराळा तालुक्यातील तडवळे येथे सनातनच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी १२ गणेशोत्सव मंडळांचे १०० हून अधिक प्रतिनिधी, जिज्ञासू, भाविक उपस्थित होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठांवर विविध प्रकारे होणारी अन्याय्य अटक आणि पुरो(अधो)गामी संघटनांचे षड्यंत्र यांचीही माहिती देण्यात आली.
४. तासगाव तालुक्यात बस्तवडे सिद्धेवाडी आणि कौलगे येथे गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या.
५. विविध ठिकाणी सामूहिक नामजप, तसेच अथर्वशीर्षपठण घेण्यात आले.
६. विटा येथील तहसीलदार, जत येथे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती, विटा येथे उपनगराध्यक्ष यांना, तर हरिपूर आणि कुंडल येथे सरपंचांना निवेदन देण्यात आले.