मुंबई : येथील दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम राबवण्यात आली. मोहिमेला भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद देत श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करण्यास प्राधान्य दिले. मुलुंड येथे समितीचे कार्यकर्ते हस्तफलक आणि हस्तपत्रके घेऊन प्रबोधन करत असतांना पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करून प्रबोधन करण्यास आडकाठी केली.
दादर चौपाटी
येथे समुद्र असूनही अनंत चतुर्दशीनिमित्त गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव बांधला होता. महानगरपालिकेने शाडू मातीच्या आणि दोन फूट उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्यासाठी आवाहन केले होते. हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने याविरोधात जनप्रबोधन मोहीम राबवण्यात आली. ‘हिंदु धर्म परंपरा जपत गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा’, असे आवाहन समितीकडून प्रबोधन मोहिमेत केले गेले. मोहिमेत समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक असे एकूण २५ जण सहभागी झाले होते.
सनातन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन
सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘वहात्या पाण्यात विसर्जन करून धर्माचरण करा’, असे आवाहन भाविकांना केले. या आवाहनाला प्रतिसाद देत विसर्जनासाठी येणार्या बहुतेक गणेशभक्तांनी सुद्धा वहात्या पाण्यातच गणेशमूर्ती विसर्जित करणे पसंत केले. या मोहिमेला पोलिसांनी सहकार्य केले. काही पोलीस अधिकार्यांनी मोहिमेचे ध्वनिचित्रीकरण केले.
क्षणचित्र
सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनीषा कुलकर्णी यांनी पुढील गणेशोत्सव शाडूच्या मातीची गणेशमूर्ती आणून साजरा करण्याचे आवाहन सर्व गणेशभक्तांना केले आणि गणेशोत्सवात वाजवला जाणारा डीजे आणि अन्य गैरप्रकार यांवर होणारा पैशाचा अपव्यय थांबवून गरजूंना साहाय्य करण्याचे आवाहन केले.
दादर चौपाटीच्या ठिकाणी राबवलेल्या प्रबोधन मोहिमेमुळे प्रभावित होऊन भाविकांनी व्यक्त केलेले मनोगत
१. तुम्ही अगदी ठामपणे मोहीम राबवता. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. तुमच्या आणि आमच्याही कार्याला लोकांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करत उत्सव साजरा केला पाहिजे. – सौ. स्वाती सोनाळकर, आर्ट ऑफ लिव्हिंग संप्रदाय
२. आज समाजाची दिशाभूल करण्याचा होणारा प्रयत्न थांबला पाहिजे आणि परंपरागत उत्सव साजरा झाला पाहिजे. – श्री. सयाजी मोरे, रयत क्रांती संघटना
३. रीतिरिवाजाप्रमाणे शाडूच्या मातीची मूर्ती हे हिंदु धर्माचे प्रतीक आहे. हिंदूंच्या सणांवर बंधने घातली जातात, हे योग्य नाही. विसर्जन वहात्या पाण्यातच करणे योग्य आहे. – श्री. प्रमोद मुणगेकर
४. वहात्या पाण्यात विसर्जन करणे, हे आम्हाला ठाऊक होते; परंतु पर्यावरणाच्या नावाखाली भीती घातली; म्हणून आम्ही कृत्रिम हौदात विसर्जन केले. तुम्ही प्रबोधन केल्यामुळे आमची चूक कळली. शाडू मातीची मूर्ती हेच खरे धर्मशास्त्र आहे. वहात्या पाण्यातच आम्ही यापुढे विसर्जन करू. – सौ. चित्रा कदम
क्षणचित्रे
१. समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनामुळे भाविकांनी २ मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन न करता वहात्या पाण्यात विसर्जित केल्या.
२. मुलुंड पूर्व येथे महानगरपलिकेने मूर्ती विसर्जनासाठी एका शाळेच्या बाजूला असलेला कचरा तेथेच थोडा सरकवून कृत्रिम हौद उभारला होता.
३. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘महापालिका वर्षभर सांडपाणी सोडते आणि श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी पर्यावरण आठवते. भक्तीभावे पूजा केलेल्या श्री गणेशमूर्तींचे हौदात विसर्जन केल्यावर या गणेशमूर्ती खाणीत टाकून श्री गणेशाची घोर विटंबना होते’, असे सांगून प्रबोधन केले. या वेळी मार्गातील अनेक लोकांनी माहिती जाणून घेतली.
मुलुंड येथील जनप्रबोधन मोहिमेस पोलिसांची आडकाठी !
धर्मांधांचे भोंगे, गोहत्या, सार्वजनिक ठिकाणी होणारे नमाज यांना आडकाठी न करता शांतातमार्गाने मोहीम राबवणार्या हिंदुत्वनिष्ठांना मात्र रोखणारे पोलीस !
मुलुंड येथे समितीचे कार्यकर्ते शांततेने आणि सनदशीर मार्गाने ‘कृत्रिम तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जन करू नका’, याविषयी भाविकांचे प्रबोधन करत असतांना मुलुंड येथील साहाय्यक पोलीस आयुक्त पांडुरंग शिंदे यांनी ‘तुमच्या या मोहिमेविषयी काही जणांचे विरोधी मत असू शकते. तसेच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो’, असे कारण सांगत भाविकांचे प्रबोधन करण्यास प्रतिबंध केला. या वेळी मुलुंड येथील आमदार श्री. सरदार तारासिंग यांना संपर्क केल्यावर त्यांनी ‘समितीचे कार्यकर्ते शांततेने जनप्रबोधन करत असतांना पोलिसांनी प्रतिबंध करणे योग्य नाही’, असे सांगून पोलिसांनी आडकाठी केल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. तसेच प्रबोधन करू देण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी थोडा वेळ प्रबोधन करण्यास मोकळीक देऊन नंतर मोहीम थांबवण्यास सांगितली.