ठाणे : गणेशोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि हिंदु धर्म संस्कृती जोपासत शास्त्रानुसार आदर्श गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा करावा, याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेचाच एक भाग म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाणे येथील उपवन तलावाच्या परिसरात, तर डोंबिवली (पश्चिम) येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तृप्ती उपाहारगृहाबाहेर, समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून आणि हस्तपत्रके वाटून नागरीकांना वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन केल्याने होणारे लाभ याचे महत्त्व पटवून देत नागरिकांचे प्रबोधन केले. भाविकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. दोन्ही ठिकाणी मोहिमेत प्रत्येकी ४० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
मोहिमेच्या वेळी आलेले अनुभव
१. प्रबोधनानंतर ६ घरगुती गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात आले.
२. ‘धर्म टिकण्यासाठी आम्ही पुढच्या वेळी वहात्या पाण्यातच विसर्जन करू’, असे एका व्यक्तीने सांगितले.
३. काही जण म्हणाले, ‘‘हे तुम्ही आधी सांगितले असते, तर आम्ही इथे आलोच नसतो.’’
४. एक व्यक्ती समितीचे फलक वाचून प्रत्येक कार्यकर्त्याला नमस्कार करत करत पुढे जात होता.
५. ‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांकडून होणारा बुद्धीभेद, अशास्त्रीय प्रचार आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच लोक कृत्रिम तलावांकडे जात आहेत’, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.
डी.जे. वाजवण्यावर बंदी असल्याने डोंबिवलीतील एका गणेशोत्सव मंडळाने मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन दुसर्या दिवशी करणार असल्याचे सांगितले. (धर्मशास्त्रानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्याला महत्त्व आहे. यावरून समाजात धर्मशिक्षण देेणे किती आवश्यक आहे, हेच लक्षात येते. – संपादक) हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यावर पूजेच्या मूर्तीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकार्याने सांगितले.