नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शन आणि मूर्तीविसर्जन मोहिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नंदुरबार : हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य हिंदु समाजासाठी प्रेरणादायी आहे. आपण करत असलेले कार्य स्तुत्य असून माझ्या या कार्याला शुभेच्छा आहेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री श्री. जयकुमार रावल यांनी काढले. त्यांनी समितीने गणेशोत्सवाच्या निमित्त लावलेल्या फ्लेक्स प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष श्री. विजय चौधरी हेही उपस्थित होते. नंदुरबार शहरातील नामांकित आधुनिक वैद्य, अधिवक्ता, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक यांनी या प्रदर्शनस्थळी भेट दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १८ ते २२ सप्टेंबर या काळात सोनारवाडी येथे श्री गणेशाचे शास्त्र, क्रांतीकारक, लव्ह जिहाद, महिलांना स्वसंरक्षणाची आवश्यकता, धर्मशिक्षण आदी विषयांवरील फलकांचे प्रदर्शन लावले होते, तसेच ‘गणेशमूर्ती दान करू नका’ या विषयीची चित्रफीत या वेळी दाखवण्यात आली.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. अनिल लोढा, अधिवक्ता श्री. प्रियदर्शन महाजन, अधिवक्ता श्री. देवेंद्र मराठे, तसेच श्री. महाराणा प्रताप युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. मोहीनीराज राजपूत हे उपस्थित होते. या प्रदर्शनाचा शाळा, महाविद्यालयाच्या तरुण-तरुणींसह ७ सहस्रांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला.
गणेशोत्सव मंडळांनी फ्लक्स प्रदर्शन आणि हस्त पत्रके यांच्या माध्यमातून केली व्यापक जनजागृती !
हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर नवापूर येथील श्री बाबा गणपती मंडळ, त्रिनेत्र गणपती मंडळ, तसेच तळोदा येथील श्री साईबाबा गणपती मंडळ, नंदुरबार येथील कुणबी राजा गणेश मंडळ यांनी आपल्या मंडळाच्या माध्यमातून येणार्या भाविकांसाठी फ्लेक्स प्रदर्शन लावले, तसेच ३ सहस्र हस्त पत्रकांच्या माध्यमातून ‘आदर्श उत्सव कसा साजरा करावा ?’ याविषयी व्यापक जनजागृती केली.
हिंदु जनजागृती समितीच्या व्यापक जनप्रबोधनामुळे अनेक ठिकाणी शाडूमातीच्या मूर्तींची स्थापना !
समितीने गेल्या पाच वर्षांपासून केलेल्या व्यापक जनप्रबोधनामुळे या वर्षी दोन सहस्रांंहून अधिक शाडू आणि चिकणमातीच्या गणेशमूर्तींची स्थापना मंडळांनी आणि भक्तांनी केली.
समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुलावरून मूर्ती न फेकता गौतमेश्वर पात्रामध्ये विसर्जन !
नंदुरबार शहर आणि परिसर येथील, तसेच शहादा या तालुक्यातील श्री गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन तीर्थक्षेत्र प्रकाशा येथील तापी नदीपात्रात करण्यात येते. तापी नदीचा पूल ६० ते ७० फूट उंच आहे. तीन वर्षापूर्वी अनेक मंडळे आणि घरगुती मूर्ती या उंच पुलावरून मूर्ती फेकून त्याची विटंबना करायचे, हा भाग लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने गेल्या तीन वर्षांपासून ‘मूर्ती विसर्जन शास्त्रीय दृष्ट्या कसे करावे ?’, या मोहिमेला आरंभ केला. त्याचाच परिणाम म्हणून जवळजवळ ९५ टक्के भाविकांनी पुलावरून मूर्ती न फेकता गौतमेश्वर नदीच्या पात्रामध्ये वहात्या पाण्यामध्ये मूर्ती विसर्जन करायला लागले. या वर्षीही भाविकांनी वहात्या पाण्यातच मूर्तीविसर्जन करण्यास प्राधान्य दिले.
हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सकाळी अकरापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत या पुलावर उभे राहून जनजागृती करत होते. गणेशभक्त समितीच्या कार्यकर्त्यांची सेवा पाहून त्यांचे कौतुक करत होते. ‘आपण सर्वस्वाचा त्याग करून धर्मकार्यासाठी ज्या पद्धतीने प्रसार आणि प्रचार करत आहात, हे विशेष आहे’, अशा प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केल्या.
अन्य मान्यवरांच्या प्रतिक्रिया
१. समितीच्या कार्यात तन-मन-धनाने सहकार्य करू ! – भुपेशभाई शाह, शिवसेना तालुकाप्रमुख, साक्री
हिंदु समाजाला खर्या अर्थाने धर्माचरणाचे महत्त्व फक्त हिंदु जनजागृती समिती समजावून सांगत आहे. धर्मशिक्षण ही आता काळाची आवश्यकता असून समितीच्या कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. समितीच्या वतीने आमच्या भागामध्ये कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही तन-मन-धनाने समर्पितपणे आपणास सहकार्य करू.
२. ‘आम्हाला प्रशासनाने किंवा कुठल्याही संघटनेने मूर्तीदान करण्यास सांगितले किंवा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास सांगितले तरी आम्ही धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करू’, असे मत भेट दिलेल्या अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
३. ‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातूनच आम्हाला धर्मशास्त्रातील योग्य-अयोग्यची ओळख होत आहे आणि धर्माचरण कसे करावे याची माहिती मिळत आहे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आलेल्या भाविकांनी व्यक्त केली.
शांतता समितीच्या बैठकीत केले प्रबोधन !
समितीने नंदुरबार शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ‘आदर्श गणेशोत्सव कसा असावा अन् कसा असू नये, तसेच मंडळांना येणार्या अडचणी’ या संदर्भात डॉ. नरेंद्र पाटील यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.