Menu Close

नंदुरबार : डॉ. नरेंद्र पाटील यांच्याविषयी पोलिसांनी काढलेला अवैध हद्दपारीचा आदेश न्यायालयाकडून रहित

  • शांतता समितीच्या बैठकीत अवैध भोंग्यांवरील कारवाईविषयी पोलिसांना विचारणा केल्याचे प्रकरण
  • न्यायालयाने उपविभागीय दंडाधिकार्‍यांवर ताशेरे ओढले !
  • डॉ. पाटील यांच्याकडून हद्दपारीचा आदेश काढणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी

सूडबुद्धी बाळगून हिंदुत्वनिष्ठांच्या हद्दपारीचे आदेश काढणारे पोलीस सर्वसामान्यांना कसे छळत असतील, याचा विचारही न केलेला बरा ! पोलीस खात्याला काळीमा फासणार्‍या अशा पोलिसांवर कारवाई होण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा !

नंदूरबार : नंदूरबार येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत डॉ. नरेंद्र पाटील यांनी पोलीस प्रशासनास ‘तुम्ही ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्याची चेतावणी देत आहात, त्याचप्रमाणे पहाटे ६ वाजण्यापूर्वी वाजणार्‍या अवैध भोंग्यांवर कारवाई करणार का ?’, असा प्रश्‍न विचारला. याचा आकस मनात ठेवून पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकार्‍यांद्वारे डॉ. पाटील यांच्या विरोधात एकतर्फी हद्दपारीची नोटीस काढली. ही हद्दपारी डॉ. पाटील, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. मयुर चौधरी यांच्यासह एकूण ७७ जणांना देण्यात आली होती. या विरोधात डॉ. पाटील यांच्यासह तिघांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अशी नोटीस दिल्याच्या प्रकरणी ताशेरे ओढत अवैध आदेश रहित केला. अधिवक्ता अनिल लोढा आणि अधिवक्ता देवेंद्र मराठे यांनी डॉ. पाटील अन् अन्य यांची बाजू मांडली. याविषयी प्रसिद्धीपत्रक काढून संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे की,

१. पोलिसांनी मला हद्दपारीच्या नोटिशीद्वारे १५ सप्टेंबर या दिवशी १६ ते २३ सप्टेंबर या कालावधीत नंदूरबार हद्दीत प्रवेश करण्यास मनाई केली. या आदेशाची कार्यवाही करतांना माझे म्हणणे ऐकून न घेता उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी एकतर्फी कारवाई केली.

२. ही कारवाई करतांना पोलिसांकडून ‘नरेंद्र पाटील आणि मयुर चौधरी यांच्या विरोधात अनेक तोंडी तक्रारी आहेत. यापूर्वी तुम्हा दोघांवर हद्दपारीचा आदेश काढला होता. असे असतांना तुमच्या वागण्यात पालट झाला नाही. आतापर्यंत तुम्ही सद्वर्तन दाखवले नाही. तुम्ही समाजात भय निर्माण करता. तुमच्या भीतीने लोक तक्रार प्रविष्ट करत नाहीत’, अशी खोटी कारणे देण्यात आली. (अशी खोटी कारणे देऊन हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस समाजात कायदा-सुव्यवस्था काय राखणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. त्याही पुढे जाऊन पोलीस प्रशासनाने ऐन गणेशोत्सव काळात प्रसिद्धीपत्रक काढून अन्य गुन्हेगारांसमवेत असलेल्या सूचीत माझ्यासह मयुर चौधरी यांचे नाव घालून आमची अपकीर्ती केली.

४. याविषयी न्यायालयाने २१ सप्टेंबर या दिवशी आदेश रहित करतांना सांगितले, ‘प्रशासनाने हद्दपारीसाठी जी कारणे दिली आहेत, ती सर्व गेल्या वेळी दिलेल्या नोटिसीमध्येच दिली होती. जर एकदा या कारणाने हद्दपारी रहित झाली आहे, तर तीच कारणे परत दाखवून हद्दपार परत कसे करता येईल ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

५. ‘गत वेळी उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी स्वत:हून ही नोटीस रहित केली होती. या वेळी माझ्याकडून सामाजिक शांतता भंग होईल, असा कोणताही अपराध अथवा गुन्हा घडलेला नसतांना, मला कोणत्याही प्रकारचे म्हणणे मांडण्याची संधी न देता पोलिसांनी केवळ सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केली’, असे मी सांगितले.

६. ‘ते समाजात भय निर्माण करतात, असा आरोप त्यांच्यावर प्रविष्ट झालेल्या कोणत्याही प्रथमदर्शी गुन्ह्यात नाही. नरेंद्र पाटील यांच्याकडून सामाजिक शांतता भंग होईल, असे एकही उदाहरण नाही’, असेही न्यायालयाने म्हटले आहे. ‘उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी स्वतंत्रपणे, तसेच निरपेक्षपणे विचार करणे अपेक्षित आहे. डॉ. पाटील यांना हद्दपार करता येईल, असे कोणतेही कृत्य त्यांनी केलेले नाही’, अशी कारणे देत न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला.

७. त्यामुळे या उदाहरणावरून पोलीस कशाप्रकारे हिंदुत्वनिष्ठांना केवळ कायद्याच्या कार्यवाहीच्या संदर्भात प्रश्‍न विचारल्यावर खोटी कारस्थाने करत हद्दपार करतात, तेच सिद्ध होते. माझ्यासह मयुर चौधरी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांवर खोटी हद्दपारी लादणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मी (श्री. नरेंद्र पाटील) या निमित्ताने करत आहे.

हिंदुत्वनिष्ठांची हद्दपारी रहित करण्यासाठी साहाय्य करणार्‍या अधिवक्त्यांचे आभार !

अधिवक्ता अनिल लोढा
अधिवक्ता देवेंद्र मराठे

अधिवक्ता अनिल लोढा आणि अधिवक्ता देवेंद्र मराठे यांनी डॉ. पाटील अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ यांची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळे पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात अवैधपणे काढलेला हद्दपारीचा आदेश रहित करण्यात आला. या साहाय्यासाठी डॉ. नरेंद्र पाटील यांनी अधिवक्त्यांचे आभार मानले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *