डाबरा (मध्यप्रदेश) : हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकवण्याची आवश्यकता नाही, हिंदू मूलत: ‘वसुधैव कुटुम्बकम’ (अर्थ : संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) या भावानेच संपूर्ण विश्वाकडे पाहातो. हा संस्कार कुटुंबांमध्येच हिंदूंवर केला जातो, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यक्त केले. (दतिया) डाबरा येथील ‘दबंग दुनिया’ वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री. मनोज चतुर्वेदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. श्री. चतुर्वेदी आणि अनिल जैन यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांच्याच हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले की,
१. ‘सेक्युलॅरिजम’ (धर्मनिरपेक्षता) हा शब्द युरोपमधून आला आहे. तेथे ख्रिस्ती पंथातील प्रोटेस्टंट, कॅथलिक आणि इतर गट यांमध्ये सतत भांडणे होत असत. त्यांच्यात समन्वय राखण्यासाठी ‘सेक्युलॅरिजम’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता.
२. हिंदूंनी सर्व पंथांचा आदरच केला आहे. हिंदूंनी कोणावरही अत्याचार केलेले नाहीत. त्यामुळे ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाची भारतात आवश्यकता नाही. हिंदूंमध्ये धर्मबंधुत्व जागृत करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षण घेऊन धर्म समजून घेणे आवश्यक आहेे.
क्षणचित्र : श्री. मनोज चतुर्वेदी यांनी ‘दबंग दुनिया’ वृत्तवाहिनीसाठी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची ‘हिंदु राष्ट्र आणि धर्मशिक्षण यांची आवश्यकता’ या विषयावर मुलाखत घेतली.
धर्मनिरपेक्ष भारतात अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना होणे, हे राज्यघटनेच्या विरोधात ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
गुना (मध्यप्रदेश) : भारत जर धर्मनिरपेक्ष देश आहे, तर येथील सर्व पंथ समान आहेत, तरी काही पंथांना विशेष दर्जा देण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्याची आवश्यकता का आहे ? असे करणे धर्मनिरपेक्ष शब्दाच्या विरोधात आहे. ‘सेक्युलॅरिजम’ला ‘पंथनिरपेक्ष’, असे म्हटले आहे, धर्मनिरपेक्ष नव्हे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितले. गुना येथील बांधकाम अभियंता श्री. प्रमोद सक्सेना यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘हावर्ड विद्यापिठाने धर्म आणि पंथ या शब्दांची व्याख्या केली आहे. धर्माची व्याख्या केली असता, त्यामध्ये केवळ सनातन हिंदु धर्म अंतर्भूत होतो आणि त्यांनी ते स्वीकारलेले आहे. पंथ मानवनिर्मित आहेत, तर धर्म अनादी आहे, हे त्यांनीही मान्य केले आहे. या व्याख्येनुसार भारत पंथनिरपेक्ष आहे, धर्मनिरपेक्ष नव्हे. भारतात ‘सेक्युलॅरिजम’च्या नावाखाली हिंदूंना धर्मशिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. येथील हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’
श्री. प्रमोद सक्सेना यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे यांची ओळख करून दिली. सद्गुरु (डॉ.) पिंगळेे यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. सर्वांनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचाही लाभ घेतला.