संपादकीय, दैनिक सनातन प्रभात
न्यायालयाने या मासाभरात हिंदूंसाठी अप्रिय ठरणारे निर्णय घेण्याची शृंखलाच चालवली आहे. शबरीमला येथील भगवान अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा ‘महिलांचा विजय’, ‘पुरो(अधो)गामी निर्णय’ म्हणून त्याचा सर्वत्र डांगोरा पिटला गेला असला, तरी न रहावून प्रश्न पडतो की, हे सर्व काय चालू आहे ? एकापाठोपाठ एक चालू असलेल्या घटनांचे ‘कोलाज’ जोडले, तर भारताला पुरो(अधो)गामी, आधुनिकतावादी यांचा मुलामा देण्याचा हा प्रयत्न आहे, हे चित्र सुस्पष्ट होते. शबरीमला प्रवेशाच्या निर्णयामुळे पुरो(अधो)गामी, पांढरपेशी समाज ‘खुश’ झाला आहे. जी मंडळी या निर्णयांचे स्वागत करत आहेत, ती आजपर्यंत कधी कुठल्या मंदिरांमध्ये चुकूनही आढळली नव्हती, जी नेहमी नास्तिकतावादाचे आणि धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गात असतात, एकप्रकारे देवाचे अस्तित्वच नाकारत असतात, तीच मंडळी आता शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळाल्याचे समर्थन करत आहेत.
विरोधासाठी विरोध !
ज्या भगवान अय्यप्पाचे दर्शन महिलांना मिळण्यासाठी हे स्त्रीमुक्तीचे भाट न्यायालयाचे दरवाजे गेली अनेक वर्षे ठोठावत होते, त्यांना हे ठाऊक तरी आहे का की, केरळमध्ये भगवान अय्यप्पाची चार प्रमुख मंदिरे आहेत. तिथे अय्यप्पांची चार रूपे आहेत. कुलातुपुळा येथे बालरूप, शबरीमला येथे ब्रह्मचारी, अचनकोविल येथे भार्यासमवेत आणि आर्यानकोवू येथे संन्यासी रूपात अय्यप्पा प्रतिष्ठित आहे. जेथे अय्यप्पा ब्रह्मचारी म्हणून प्रतिष्ठित आहे, ते शबरीमला सोडून अन्य तीनही, तसेच जगातील इतरही अय्यप्पा मंदिरांत महिलांच्या प्रवेशाला बंदी नाही. स्त्री-स्वातंत्र्याच्या नावाखाली मंदिरात वर्षानुवर्षे चालू असलेल्या प्राचीन परंपरा मोडून अशा किती महिला शबरीमला येथेच भगवान अय्यप्पाच्या दर्शनाला जाणार आहेत ?
यादंर्भात ‘राईट टू प्रे’ नावाने आधुनिकतावाद्यांनी आता देवाच्या दर्शनावरही हक्क दाखवणे चालू केले आहे. एकीकडे व्यभिचाराला अधिकृत ठरवतांना न्यायालयाने ‘पती हा पत्नीचा मालक नाही’, असे स्पष्ट म्हटले आहे, तर हे ‘राईट टू प्रे’वाले साक्षात भगवंताचे मालक झाले आहेत का ? त्यांना वाटले की, ‘अनुमती नसतांना गाभार्यात जाऊन दर्शन घेणार’, त्यांना वाटले की, ‘शनीच्या चौथर्यावर चढून दर्शन घेणार’, त्यांना वाटेल, तेव्हा ‘सर्व वयोगटातील महिला ब्रह्मचारी रूपातील अय्यप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार’, असे मनानेच करायला देवतांवर पुरोगाम्यांचा मालकी हक्क आहे का ? देवावरील श्रद्धेचाच प्रश्न होता, तर जेव्हा केरळमध्ये उघड्यावर गोमांस मेजवानी झाली, तेव्हा कुठे होती या मंडळींची श्रद्धा ? पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात सार्वजनिक ठिकाणीच श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली असतांना तिला पुरोगाम्यांनी विरोध केला, तेव्हा कुठे होते श्रद्धेचे हक्कदार ?
‘मंदिरे अथवा धार्मिक स्थळे ही सार्वजनिक स्थाने आहेत; म्हणून तेथे जाण्यापासून महिलांना रोखणे अयोग्य आहे’, असे निकालात म्हटले आहे. रुग्णालयांतील ‘शस्त्रकर्म विभाग’, ‘क्ष किरण चाचणी’ विभाग आदी ठिकाणी जाण्यास मनाई असते. कुणी म्हणाले की, ‘मला तेथे जायचेच आहे’, तर जाण्यास अनुमती असते का ? उद्या कुणी ‘मला मुख्यमंत्र्यांचे काम आवडते आणि मंत्रालयाची वास्तूही त्यांची खासगी वास्तू नाही’, असे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला, तर त्यालाही आपण संरक्षण देणार आहोत का ? न्यायालय अशा प्रकरणी काय भूमिका घेईल ? प्रत्येक गोष्टीच्या काही कक्षा आणि मर्यादा असतात. त्या मर्यादांवरच सृष्टीचे कामकाज चालू असते. जे स्वैराचारी या मर्यादा मानत नाही, त्यांना अशी दुर्बुद्धी होत असते.
प्रथा रहित करणे, न्यायालयाचे काम आहे ?
वास्तविक पूर्वीच्या काळी न्यायव्यवस्था धर्माधारित होती. धर्माचार्यच न्यायदानाचे कार्य करत असत. त्यामुळे तो धर्मन्याय होत असे. आज लोकशाहीत धर्म आणि न्यायदान ही निरनिराळी क्षेत्रे आहेत. त्यामुळेच न्यायालयांना धर्माच्या क्षेत्रात निर्णय देण्याची वेळ आली आहे. असे असले, तरी ‘धर्म काय सांगतो’, हे जाणून घेऊन त्यानुसार निवाडा करणे आवश्यक आहे. ज्या पाच जणांच्या खंडपिठाने शबरीमला प्रकरणी अंतिम निकाल दिला, त्यातील इंदू मल्होत्रा या न्यायमूर्तींनी अत्यंत चांगली भूमिका मांडली होती. ‘समानतेच्या अधिकाराला धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारासमवेत पाहिले पाहिजे. प्रथा रहित करणे, न्यायालयाचे काम नाही’, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. खरेच आहे ते ! कुणीही सश्रद्ध महिला देवस्थानची अनुमती नसतांना केवळ कायद्याने अनुमती आहे; म्हणून देवस्थानची कक्षा ओलांडणार नाही. कोल्हापूरची अंबाबाई असो वा शनिचौथरा असो, ज्या महिला देवाच्या खर्या भक्त आहेत, त्यांनी कायद्याने अनुमती असूनही आतापर्यंत प्राचीन मर्यादा ओलांडलेली नाही. शबरीमला येथील भगवान अय्यप्पाच्या सश्रद्ध महिलाभक्त आहेत, त्यांनी यापूर्वीच ‘रेडी टू वेट’ म्हणजे ‘वाट पहाण्यास सिद्ध’ नावाची चळवळ चालू केली आहे. त्या लक्षावधी महिलांनी उघडपणेच सांगितले आहे की, आम्ही ५० वर्षे वय होईपर्यंत भगवान अय्यप्पाच्या दर्शनासाठी थांबण्यास सिद्ध आहोत. असे आहे, तर ज्यांची देवावर काडीमात्र श्रद्धा नाही, अशा २-४ आधुनिकतावाद्यांसाठी देवतांचा रोष का ओढवून घेतला जात आहे, हा प्रश्न आज हिंदूंना सतावत आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात