Menu Close

बेळगाव येथे सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

नक्षलवाद्यांच्या समर्थकांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’ आणि हिंदुत्वनिष्ठांना मात्र ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणे ही आजची धर्मनिरपेक्षता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव : नालासोपार्‍यात कथित स्फोटक प्रकरण आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी गेल्या मासात ९ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. यांपैकी कुणीही सनातन संस्थेचे साधक नसतांना ‘सनातन संस्थेवर बंदी घाला’, अशी बिनबुडाची आणि उथळ मागणी काही राजकीय पक्ष, संघटना, तथाकथित पुरोगामी, मुसलमान नेते आदी करत आहेत. काही प्रसारमाध्यमे सनसनाटी आणि दिशाभूल करणार्‍या बातम्या प्रसारित करून ‘हिंदु आतंकवादा’चा ढोल बडवत आहेत; मात्र दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांना सोयीस्करपणे पाठीशी घातले जात आहे, हा दुटप्पीपणा आहे. हिंदूंवरील गुन्हे सिद्ध न होताही त्यांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणार्‍यांचा आणि नक्षलवाद्यांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘मानवाधिकार कार्यकर्ते’ म्हणून उदात्तीकरण करणार्‍यांचा खरा चेहरा समोर आला आहे. धर्मपरायण सत्यनिष्ठ सनातन संस्थेच्या बाजूने यायचे कि धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व यांचा बुरखा पांघरून नक्षलवाद्यांना समर्थन करायचे ? असा प्रश्‍न करत ‘धर्माचे रक्षण करणार्‍यांचेच धर्म अर्थात् ईश्‍वर रक्षण करतो’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. ऋषिकेश गुर्जर यांनी येथे केले.

नालासोपारा स्फोटक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निष्पाप हिंदुत्ववाद्यांच्या समर्थनार्थ आणि सनातन संस्थेवर करण्यात आलेल्या बंदीच्या अन्याय मागणीच्या विरोधात येथे ३० सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना लक्ष्य करणार्‍या षड्यंत्राचे अन्वेषण करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

पुरोहित संघटनेचे सर्वश्री श्रीपाद देशपांडे, धनंजय वडेर, भाजपचे उत्तर विभागाचे अध्यक्ष श्री. मारुती सुतार, कार्यकर्ते श्री. अनिल कुरणकर, कर्तव्य महिला मंडळाच्या आक्काताई सुतार, दैनिक सनातन प्रभातचे वाचक सर्वश्री विजय मेलगे, नितीन कुलकर्णी, धर्मप्रेमी सर्वश्री नंदू नेसरकर, शुभम आपटेकर, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सदानंद माशेकर, शिवा कदम, आनंद करलिग्नावर, महादेव गोंडी, गणेश चौगुले, दत्तात्रय अवदोनकर आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते असे एकूण २१ जण उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण

आंदोलन चालू असतांना बरेच जण गाडी थांबवून विषय समजून घेत होते. त्यांना दैनिक सनातन प्रभातचा ‘सनातन सत्यदर्शन’ विशेषांक देण्यात आला. धर्मप्रेमी श्री. अनिल कुवळेकर यांनी ‘असे आंदोलन असेल, तर मला कळवा. मी पुढच्या वेळी नक्की येतो’, असे सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *