Menu Close

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते मरवनपुलावु सच्चिदानंदन् यांनी गोहत्या रोखण्यासाठी केलेले अनुकरणीय प्रयत्न

श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् हे श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु समाज आणि मंदिरे यांचे रक्षण करणार्‍या ‘शिवसेनाई’ या संघटनेचे संस्थापक असून त्यांनी साधनेद्वारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित केलेल्या विश्‍व हिंदू संमेलनात सहभाग घेऊन श्रीलंकेतील हिंदूंच्या दयनीय स्थितीला वाचा फोडली आहे. आज श्रीलंकेत अल्पसंख्य झालेल्या हिंदु समाजाच्या आणि हिंदु धर्माच्या रूढी अन् परंपरा जागृत ठेवण्यासाठी श्री. सच्चिदानंदन् त्यांच्या अल्प शक्तीनिशी लढा देत आहेत. श्रीलंकेत धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोवंशाच्या हत्येविरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याची गोष्ट त्यांच्याच शब्दांत येथे मांडत आहोत.

१. मंदिराच्या पुजार्‍याकडून गोवंशाची हत्या चालू असल्याची माहिती मिळणे

एके दिवशी सकाळी मी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तेथील पुजार्‍याने माझ्या हातावर प्रसाद ठेवतांना माझ्याशी बोलण्याची इच्छा दर्शवली. त्याने ‘स्थानिक चावाकाचेरी बाजारात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्या होत आहे. हे पशू चोरी करून आणलेले असून त्यांचे गोमांस देशाच्या दक्षिण भागात तस्करी करून विकण्यात येत आहे’, अशी माहिती दिली आणि त्याचा मी निषेध करावा, अशी विनंती केली. ‘मी त्याचा निषेध करून काही होणार नाही, त्यासाठी कृतीच करावी लागेल’, असे उत्तर मी त्याला दिले. मी पुजार्‍याला गोवंशहत्येसंबंधी अधिक माहिती विचारली असता त्याने त्यासाठी गावातील एका हिंदु तरुणाचे नाव सांगितले.

२. गोहत्येच्या विरोधात समविचारी व्यक्तींना संघटित करणे

काही दिवसांनंतर मी गावात फेरफटका मारला असता त्या तरुणाची भेट झाली. तो एक प्रचंड इच्छाशक्ती असलेला ध्येयवेडा तरुण होता. त्याने बाजारात चालत असलेल्या पशूवधगृहाविषयी इत्थंभूत माहिती दिली. मी त्यालाही ‘निषेधपत्र देऊन काही साध्य होणार नाही. त्यासाठी समविचारी व्यक्तींची एक बैठक घेऊन पशूवधगृहाविरुद्ध काय कृती करावी, हे ठरवणे योग्य होईल’, असे सांगितले. मी त्याला माझ्या ओळखीच्या समविचारी व्यक्तींची एक सूची दिली. काही दिवसांनी तो माझ्या घरी आला आणि त्याला मी दिलेल्या सूचीतील व्यक्तींकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याचे सांगितले. अशा व्यक्ती आणि त्या तरुणाचे काही ओळखीचे लोक अशी एक पूर्ण दिवसाची बैठक घेण्याचे नियोजन झाले. तसेच या बैठकीत तमिळनाडू येथील एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याला निमंत्रित केल्यास बैठकीचा चांगला परिणाम निघेल, यावर एकमत झाले. त्याप्रमाणे तमिळनाडू येथील श्री. राम रवि कुमार या चांगल्या वक्त्यास निमंत्रित केले. त्यांनीही या बैठकीस स्वखर्चाने येण्याचे मान्य केले.

वरील प्रमाणे ही बैठक चावाकाचेरी येथील नुनावील येथे ‘अहिंसक प्रत्यक्ष कृती गट’ म्हणून घेण्यात आली. त्यात पुजारी, सेवानिवृत्त अधिकारी, विद्यार्थी आणि काही तरुण असे सुमारे ४५ जण उपस्थित होते. ते सर्व जाफना प्रांतातील असून त्यांच्या भागात असलेल्या पशूवधगृहांना बंद करण्यासाठी प्रयत्नशील होते. बैठकीत त्यांच्या भागात असलेल्या हिंदूंच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. त्यातील काही मुख्य प्रश्‍नांची निवड करून त्यावर कृती करण्याचे ठरवले. श्री. राम रवि कुमार यांनी आमच्या गटाला ‘अविना अरोव्हर’ असे नाव दिले. २ आठवड्यांनंतर आमच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. या वेळी अमेरिकेतील श्री. महादेवन् आणि त्यांच्या पत्नीही आमच्याबरोबर उपस्थित होत्या.

३. पशूवधगृहाच्या विरोधात भित्तीपत्रकांद्वारे विरोध

पोलिसांच्या माहितीप्रमाणे सर्व पशूवधगृहे परवानाधारक होती; मात्र ते आणत असलेले पशूधन चोरीचे होते आणि तो गुन्हा असल्याने त्यावर कृती करणे पोलिसांचे काम आहे, असे पोलिसांना पटवून देण्यात आले; मात्र त्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने धर्मांधांना अधिकच चेव चढला. त्यांच्या अवैध कृत्यांना काहीच आळा बसला नाही. नंतर आम्ही भित्तीपत्रकांची मोहीम चालू करून त्याद्वारे लोकांना ‘त्यांचे पशूधन कसायांना विकू नये’, असे आवाहन केले. या भित्तीपत्रकांवर माझे नाव आणि दूरभाष क्रमांक दिला होता. त्यामुळे मला काही जणांचे अभिनंदनाचे दूरभाष आले, तर इतर बहुतेक शिवीगाळ करणारे होते. मी त्यांची भाषणे ध्वनीमुद्रित करून पोलिसांना कळवत होतो.

४. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘पशूवधगृहांना अनुमती देणार्‍या उमेदवारांना मते देऊ नका’, म्हणून अभियान !

असे एक वर्ष लोटले; मात्र परिस्थितीत पालट घडून आला नाही. शेतकर्‍यांचे पशू चोरले जातच होते. काही चोरांना पकडून पोलिसांत देण्यात आले. प्रसारमाध्यमांनीही हा प्रश्‍न उचलून धरला. त्यांनी धर्मांधाच्या पशू चोरून हत्या करण्याच्या प्रकारांना आम्ही केलेल्या निषेधाच्या वृत्तांना प्रसिद्धी देण्यास आरंभ केला. तशातच श्रीलंका शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित केल्या. या संस्थांना पशूवधगृहांना परवाना देण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार होते. या संधीचा लाभ उचलत आम्ही मतदारांना आवाहन केले की, ‘पशूवधगृहांना अनुमती देणार्‍या उमेदवारांना मते देऊ नका.’ हे अभियान आधी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून करण्यात आले. नंतर आम्ही भित्तीपत्रकांच्या माध्यमांतून बहुसंख्य मतदारांपर्यंत पोचलो. काही भित्तीपत्रकांच्या माध्यमांतून आम्ही मतदारांना ‘केवळ हिंदू उमेदवारांनाच मते द्या’, असे आवाहन केले. अनेक राजकीय पक्षांनी आमच्यावर टीका केली की, आमच्या अभियानामुळे त्यांच्या मतदारांवर वाईट परिणाम झाला.

५. पशूवधगृहाच्या विरोधात काढलेला भव्य मोर्चा !

तेवढ्यातच योगायोगाने एक घटना घडली. चावाकाचेरी शहर समितीचे सदस्य शहरातील नागरी सुविधांची पाहणी करत असतांना त्यांना पशूवधगृहात हत्या करण्यासाठी आणलेल्या पशूंचे करूण आवाज ऐकू आले. समितीच्या सदस्यांनी तिकडे धाव घेतली असता त्यांना गर्भार गायी, वासरे अशी ३० ते ४० पशूंची एकापाठोपाठ हत्या होत असल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकाराचे चित्रीकरण करून ते पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांना दिले. आम्हीही निषेध मोर्च्याचे आयोजन केले. त्यात प्राचार्य, शिक्षक, डॉक्टर्स, व्यावसायिक, बँकेचे नोकरवर्ग, महिला आणि तरुण यांचा सहभाग होता. मोर्च्याची लांबी १ किलोमीटर एवढी लांब होती. या मोर्च्याची दखल नगरपरिषदेच्या महिला अध्यक्षांनीही घेतली आणि त्वरित कृती करण्याचे आश्‍वासन दिले. प्रसारमाध्यमांनी मोर्च्याला चांगली प्रसिद्धी दिली.

६. १२ घंट्यांचे उपोषण !

काही दिवसांनी आम्ही बसस्थानकाजवळ १२ घंट्यांचे उपोषण केले. त्याला शैव मठ, बौद्ध विहार आणि चिन्मय मिशन यांच्या प्रमुखांचेही आशीर्वाद लाभले. या वेळी धार्मिक नेते, वरिष्ठ नागरिक आणि तरुण यांनी प्रबोधन केले. माझ्या भाषणात मी श्रीलंकेच्या ५ सहस्र वर्षांपासून चालत आलेल्या पशूच्या रक्षण करण्याच्या परंपरेची आठवण करून देऊन हिंदु आणि बौद्ध नागरिकांनी या परंपरेचे रक्षण करण्याचे आवाहन केले, तसेच ‘ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी इतर देशात निघून जावे’, असेही म्हटले.

७. शहर समितीकडून गोहत्याबंदीचा ठराव संमत

याच सुमारास दक्षिण श्रीलंकेतील कलुथाराई जिल्ह्यातील प्रदेसिया स्थानिक समितीने ठराव पारित करून पशूंची हत्या, गोमांस विक्री आणि दारूची दुकाने यांवर बंदी आणली. मी तेथे जाऊन समितीचे आणि या ठरावामागील प्रेरणा असलेल्या बौद्ध भिख्खूंचे अभिनंदन केले. मधल्या काळात आम्ही चावाकाचेरी शहर समितीच्या सदस्यांची भेट घेतली. १८ पैकी १३ सदस्यांनी वरील प्रकारचा ठराव पारित करण्याची सिद्धता दाखवली. मी शिकागोवरून परत आल्यावर या प्रकरणात काय झाले, याची चौकशी केली. दुसर्‍या दिवशी नाल्लूर येथील स्थानिक समितीने गोहत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी आणण्याचा ठराव पारित केल्याचे कळले. खरे पाहता तेथे आम्ही काहीच कार्य केले नव्हते. त्याआधी माठूगामना येथील स्थानिक समितीनेही असाच ठराव पारित केला. त्या समितीच्या अध्यक्षांचा आम्ही नाल्लूर येथेच सत्कार केला होता. आज मी प्रसारमाध्यमांच्या कार्यक्रमांचा खरा नायक ठरलो होतो.

गोहत्या आणि गोमांस विक्री यांवर बंदी घालण्याचा ठराव पारित करणार्‍या नाल्लूर (श्रीलंका) विभागीय समितीच्या सदस्यांचा सत्कार

सत्कार करण्यात आलेले सदस्य, समवेत १. श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन्

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या पूर्व तटावरील नाल्लूर विभागीय समितीने त्यांच्या कार्यक्षेत्रात गोहत्या आणि गोमांस विक्री यांवर बंदी घालण्याचा ठराव पारित केल्यामुळे समितीच्या सदस्यांचा स्वागतसमारंभ अरुल्मिको थिरूमल, श्रीविष्णु, श्रीकृष्ण आणि व्यंकटेश्‍वर यांच्या वाल्लीपुरा अलवार मंदिरात पार पडला. या वेळी मंदिराच्या उत्सवासाठी आलेले सहस्रावधी हिंदू या समारंभास उपस्थित होते. असाच ठराव देशातील इतर स्थानिक समित्यांनी पारित करावा, अशी मागणी सर्वांनी केली.

१. या समारंभाच्या प्रमुख पाहुणेपदी शिवसेनाई संघटनेचे नेते श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् होते, तर रेव्हरंड सिवा बाला थेसिकार यांनी अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी उपस्थित वक्त्यांनी ‘गोमांस भक्षणाची सक्ती ४०० वर्षे आधी पोर्तुगीज आक्रमणकर्त्यांनी ठार मारण्याची धमकी देऊन चालू केली होती. नंतर आलेल्या ब्रिटीश राज्यकर्त्यांनी तिचे समर्थन केले आणि त्यांनीच आयात केलेल्या मुसलमानांच्या हाती गोमांस विक्रीचा व्यवहार सोपवला’, अशी माहिती दिली.

२. स्वागत समारंभात नाल्लूर विभागीय समितीच्या ९ सदस्यांचा सोनेरी शाल आणि सोनेरी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. समितीचे उपाध्यक्ष श्री. आर्. जयकिरण हे या प्रसंगी उपस्थित होते. गोहत्या आणि गोमांस विक्री यांवर बंदी घालण्याचा ठराव मांडणारे सदस्य श्री. मधुसूदन यांनी सर्व सदस्यांच्या वतीने आभार मानले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *