शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश खुला केल्यामुळे सध्या भारतातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. ‘पीपल फॉर धर्म’च्या अध्यक्षा शिल्पा नायर यांची एक मुलाखत ‘हिंदु पोस्ट’ वेबपोर्टलवर प्रकाशित झाली आहे. ती वाचल्यावर शबरीमला प्रकरणातील सर्व शंका दूर होतील, अशी आशा आहे.
१. लाखो महिला भक्त परमेश्वराच्या आदेशाचे पालन करण्यास सिद्ध !
‘हिंदु धर्मातील काही डोळस महिलाभक्तांनी काही महिन्यांपूर्वी ‘रेडी टू वेट’ (वाट पहाण्यास सिद्ध) नावाचे एक ऑनलाइन अभियान चालू केले होते. ‘शबरीमला मंदिरातील प्रवेशासाठी वयाची पन्नाशी गाठेपर्यंत थांबण्यास आम्ही सिद्ध आहोत’, अशी इच्छा प्रदर्शित करणार्या भारतातील लाखो महिलांनी या अभियानात सहभागी होऊन हिंदु धर्मावर कावळ्यांप्रमाणे तुटून पडणार्या बुद्धीवाद्यांना चकित केले. या अभियानाच्या एक प्रवर्तक शिल्पा नायर होत्या. शास्त्रीय संगीत आणि नृत्यात प्रावीण्य प्राप्त असलेल्या शिल्पा नायर या मूळ केरळच्या असून सध्या दुबईत उद्योजिका म्हणून प्रतिष्ठित आहेत. ‘रेडी टू वेट’ अभियान चालू करण्यामागची भूमिका सांगतांना शिल्पा नायर म्हणाल्या की, मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शबरीमला मंदिरातही महिलांना प्रवेश मिळावा; म्हणून ‘राईट टू प्रे’ (पूजेचा अधिकार) नावाचे एक ऑनलाइन अभियान चालू करण्यात आले. हाजी अली दर्गा आणि शबरीमला यांची तुलना म्हणजे संत्री अन् सफरचंद यांची तुलना करण्यासारखी आहे. दोन्ही ठिकाणच्या पूजापद्धती, ईश्वराच्या अगदी वेगळ्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या आहेत. शबरीमला येथील परंपरा महिलांना संपूर्ण प्रवेशबंदीची नाही. केवळ विशिष्ट वयोगटातील महिलांनाच ही बंदी आहे. हा भेद प्रवेशबंदीला विरोध करणार्यांनी लक्षातच घेतला नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की, आमच्या परंपरांचे दुसर्यांनी रक्षण करण्याऐवजी, आम्ही महिला भक्तांनीच आता पुढे येऊन आमच्या परमेश्वराच्या आदेशाचे पालन करण्याचा संकल्प सोडला पाहिजे. त्यातूनच या ‘रेडी टू वेट’ नावाच्या अभियानाचा जन्म झाला. या मंदिरात प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरांचे पालन करण्यास आम्ही तयार आहोत. ‘आम्ही वयाची पन्नाशी गाठेपर्यंत थांबण्यास तयार आहोत’, असे ठामपणे सांगणार्या लाखो भारतीय महिलांचा आम्हाला पाठिंबा मिळाला. आमच्या देवाला या उपर्या लोकांनी (पुरोगाम्यांनी) ‘स्त्रीद्वेष्टा’ म्हणावे, हे कुणालाच रुचले नाही आणि त्यामुळे पक्षीय भेदापलीकडे जाऊन आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
२. जगातील अन्यत्रच्या सर्व अय्यप्पा मंदिरांत सर्व वयोगटातील महिलांना मुक्त प्रवेश !
‘विशिष्ट वयातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीचे तुम्ही कसे समर्थन करता’, असे विचारले असता शिल्पा नायर म्हणाल्या, ‘‘विविध मंदिरांत असलेल्या देवता वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित आहेत. शबरीमला मंदिरात असलेली ही परंपरा ‘या मंदिरातील देवता ‘शास्ता’ (भगवान अय्यप्पा) हा ब्रह्मचर्याचे पालन करणारा आहे’, या तथ्यावर आधारित आहे. इतर अय्यप्पा मंदिराहून शबरीमला अय्यप्पा वेगळा आहे. इथे हा (भगवान अय्यप्पा) ‘धर्मशास्ता’ म्हणून पूजिला जातो. केरळमध्ये अय्यप्पाची चार प्रमुख मंदिरे आहेत. तिथे अय्यप्पांची चार रूपे आहेत. कुलातुपुळा येथे बाल, शबरीमला येथे ब्रह्मचारी, अचनकोविल येथे भार्यासमवेत आणि आर्यानकोवू येथे संन्यासी रूपात अय्यप्पा प्रतिष्ठित आहे. जेथे अय्यप्पा ब्रह्मचारी म्हणून प्रतिष्ठित आहे, ते शबरीमला सोडून बाकी तीनही, तसेच जगातील इतरही अय्यप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशाला बंदी नाही.
३. ४१ दिवसांचे अत्यंत कडक ‘व्रत’ आचरण्यास महिला असमर्थ !
एका विशिष्ट वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश नसण्याचे कारण अतिशय सोपे आहे. शबरीमलाच्या यात्रेकरूंना ४१ दिवसांचे अत्यंत कडक ‘व्रत’ आचरायचे असते. त्याला ‘मंडल व्रत’ असे म्हणतात. मासिक पाळीमुळे महिला हे व्रत पूर्णपणे आचरण करू शकत नाही. शबरीमला येथील अय्यप्पा हा नैष्ठिक ब्रह्मचारी असल्यामुळे मंदिराच्या गर्भगृहातील शक्तीच्या प्रभावात वारंवार आल्याने प्रजननक्षम महिलांमध्ये असलेल्या नैसर्गिक सर्जनशक्तीत असंतुलन निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या कुमारिका आहेत किंवा ज्यांना ‘मोनोपॉज’ (मासिक पाळी बंद झाली आहे) आला आहे, अशाच महिला ही यात्रा करू शकतात.
४. ज्यांना धर्माचे कणभरही ज्ञान नाही, अशांनी परंपरांविषयी का बोलावे ?
खरेतर ‘शिक्षित महिलांनी जुन्या परंपरांच्या विरुद्ध बंड करायचे असते’, असे मानले जाते; परंतु ‘रेडी टू वेट’ अभियानातील महिला शहरी आणि शिक्षित आहेत. यात तुम्हाला विरोधाभास जाणवत नाही का’, असे विचारल्यावर शिल्पा नायर म्हणाल्या, ‘‘शबरीमला येथे चालू असलेली प्राचीन परंपरा, आपला सनातन धर्म ज्या वैविध्यतेच्या आधारावर उभा आहे, ती जपणारी आहे. ज्यांना केरळच्या मंदिरातील विशिष्ट परंपरांचे कणभरही ज्ञान नाही, अशा काही महिलांनी म्हणावे की, समानता आणण्यासाठी या परंपरांना नष्ट करा, तर आम्हाला आमच्या धर्माने दिलेले विशिष्ट अधिकार आम्ही का म्हणून सोडावे ?’’
५. हिंदु मंदिरांमध्ये हिंदूंचा हस्तक्षेप संविधानानुरूप नाही !
‘परंपरा आणि संस्कृती यांच्या बाजूने ठाम उभे राहिल्यावरून तुम्हाला काही विरोध झाला का ?’, यावर शिल्पा नायर म्हणाल्या, ‘‘प्रस्थापित विचारवंत असलेल्या कथित स्त्रीवाद्यांकडून आमच्यावर कडक टीका झाली. तथ्यांच्या आधारावर आमचे म्हणणे खोडून काढणे जमले नाही; म्हणून मग ही मंडळी जातीवर घसरली. नायर जातीवर व्यंग्यचित्रे आदी काढण्यात आली. आमच्या अभियानाला जो अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याची या कथित स्त्रीवाद्यांना अपेक्षाच नव्हती. त्यांना वाटते की, त्यांच्या आधुनिकतेच्या आणि प्रागतिकतेच्या मार्गानेच हिंदु धर्माला पुढे नेता येईल; परंतु हताशेमुळे त्यांनी वैयक्तिक चिखलफेक चालू केली. आम्ही तिकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविले. आमची आमच्या धर्मावर श्रद्धा आहे आणि आमच्या कर्मानुसार आम्हाला पुढे जायचे आहे. आज आम्हा हिंदूंना तीव्र भेदभावाचा सामना करावा लागत आहे. आमच्या मंदिरांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. हा हस्तक्षेप संविधानानुरूप नाही. संविधानाने सर्वांना समान वागणूक द्यायला हवी. केवळ हिंदूंच्याच मंदिरांमध्ये हस्तक्षेप का ?’’
शिल्पा नायर यांच्या पुढाकाराने चालू झालेले ‘रेडी टू वेट’ हे अभियान आणि त्यांची ही भूमिका धर्मस्थळांच्या संदर्भात ‘मला काय त्याचे’ म्हणून मौन बाळगणार्या महाराष्ट्रातील धर्मप्रेमींना निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मला वाटते.’
– श्री. श्रीनिवास वैद्य
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात