मध्यप्रदेश संपर्क अभियान
गुना (मध्यप्रदेश) : भारतामध्ये सर्व राज्यांत राज्यघटनेचे पालन केले जाते; मात्र काश्मीरमध्ये त्याचे पालन केले जात नाही. तेथे आणखी एक राज्यघटना आहे. भारतात २ राज्यघटनांनुसार निर्णय घेतले जातात. अशा प्रकारे काश्मीरमध्ये राज्यकारभार चालू आहे. याची माहिती सर्वसामान्य भारतियांना नाही, हे भारताचे दुर्दैव आहे. यातून भारतीय शासनकर्त्यांनी जनतेची किती मोठी फसवणूक केली आहे, हे लक्षात येते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. विश्व हिंदु परिषदेचे श्री. प्रमोद भार्गव यांच्या कार्यालयात धर्माभिमान्यांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागणे, हे भारतियांचे दुर्दैव !
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘भारताचा अविभाज्य अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये अन्य राज्यांतून भारतीय जातात, तेव्हा त्यांना व्हिसा घ्यावा लागतो. नेपाळ स्वतंत्र देश असला, तरी तेथे जाण्यासाठी भारतियांना व्हिसा लागत नाही. आपल्याच राज्यात जाण्यासाठी भारतियांना व्हिसा घ्यावा लागणे, हे किती मोठे दुर्दैव आहे. शासनकर्त्यांनी भारतीय लोकशाहीला किती मोठा विनोद करून ठेवला आहे, हे यातून लक्षात येते. या सर्व संकटांतून आणि परिस्थितीवर मात करून भारताला पुन्हा एकदा गौरवशाली बनवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे.’’ या वेळी धर्मप्रेमींच्या शंकांचे निरसनही सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी केले.