श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचे प्रकरण
कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीचा हा प्रयत्न स्तुत्य असून असा नियम राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
श्री. घनवट यांनी पुढे म्हटले आहे की,
१. तिरुपती येथील मंदिरासह देशातील अनेक मंदिरांत तोकड्या कपड्यांत महिला आणि पुरुष भाविकांना देवाचे दर्शन दिले जात नाही. काही मंदिरांत स्थानिक प्रथा-परंपरेनुसार पोषाखाचे नियम असतात. तसेच गाभार्यात जाऊन दर्शन घ्यायचे असेल, तर सोवळ्यात जावे लागते. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, अशी आमची भूमिका आहे.
२. सार्वजनिक जीवनात जगतांनाही नियमांचे पालन करावे लागते. अनेक आस्थापना आणि कार्यालये येथे महिला अन् पुरुष यांच्यासाठीचा विशिष्ट पोषाख (ड्रेस कोड) ठरवून दिलेला असतो. शाळा-महाविद्यालये, पोलीस खाते, रुग्णालये आदी ठिकाणी गणवेश असतो किंवा विशिष्ट पोशाख असतो. तेथे सर्व नियम पाळले जातात; मग मंदिरांनी असे नियम केल्यास ते पाळण्यासाठी विरोध का ? केवळ तथाकथित पुरोगामी लोकांकडून धर्माशी संबंधित विषय असल्यानेच विरोध केला जात आहे.
३. ज्यांची देवावर श्रद्धा नाही, ते लोक ‘देवाच्या दारी आम्ही कसे जावे, हे आम्ही ठरवू’, अशी विधाने करत आहेत. ‘मंदिरात काय असावे, काय असू नये’, हे पुरोगाम्यांनी नव्हे, तर धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने ठरवायला हवे.
४. मंदिरे ही हिंदूंसाठी चैतन्याचा स्रोत आहेत. तेथील शक्ती, चैतन्य, सात्त्विकता आणि ऊर्जा ही भाविकांनी मनोभावे पूजा केल्याने तर मिळतेच; पण सात्त्विक वस्त्र परिधान केल्यास ती अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो, असे अध्यात्मशास्त्र सांगते. भाविकांनी पुरोगाम्यांच्या अपप्रचाराला न भुलता धर्मपालन करावे.