शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण
थिरुवनंतपूरम् : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात केरळ राज्यातील थिरुवनंतपूरम्, कोल्लम, अलाप्पुझा, पठाणमथिट्टा, एर्नाकुलम आणि पलक्कड येथे अनेक हिंदु संघटनांच्या नेतृत्वाखाली सहस्रो महिला अन् पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे आयोजित केले. बहुतेक मोर्च्यांच्या आयोजनामध्ये डॉ. प्रवीण तोगाडिया यांच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने पुढाकार घेतेला होता. तसेच भाजप, अय्यप्पा धर्म संरक्षण समिती आदी संघटनांनी हिंदू ऐक्याचे विराट दर्शन घडवले.
१. राजधानी थिरुवनंतपूरम्मध्ये आंदोलकांनी किल्लीपालाम येथे रस्त्यावर सकाळी ११ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन केले; मात्र त्यांनी रुग्णवाहिका आणि रुग्णांना नेणारी वाहने यांना रस्ता मोकळा करून दिला.
२. आमबिली नावाच्या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा असफल प्रयत्न केला. आंदोलकांनी अनेक फलक हाती धरले होते. त्यावर ‘भगवान अय्यप्पांपेक्षा न्यायालय मोठे नाही’ आणि ‘केंद्र आणि राज्य सरकार यांनी कायदा करून प्राचीन परंपरेचे जतन करावे’, असे लिखाण केले होते. हे संपूर्ण आंदोलन भगवान अय्यप्पांचे मंत्रपठण करून शांततेत पार पडले.
३. अय्यप्पा धर्म संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ श्री. राहुल ईश्वर यांनी कोविल ते पालायाम असा मोर्चा काढला.
४. पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पंडलम येथे शाही कुटुंबातील सदस्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्यात ‘अय्यप्पा धर्म संरक्षण दिन’ पाळण्यात आला. त्यात सहस्रो महिला आणि पुरुष यांनी भाग घेतला.
५. केरळ राज्यातील बहुतेक मोठ्या शहरात रहदारी ठप्प झाली होती. सहस्रो भाविकांनी स्वाक्षर्यांच्या मोहिमेत भाग घेऊन निषेधपत्रावर स्वाक्षर्या केल्या.
६. त्रावणकोर देवस्वम् बोर्डाचे माजी अध्यक्ष प्रयर गोपालकृष्णन् यांनीही या आंदोलनात सहभाग घेत नेतृत्व केले. ‘न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सतत विरोध करत रहाणार’, असे गोपालकृष्णन् यांनी म्हटले आहे.
७. ‘प्रत्येक धार्मिकस्थळाची स्वतंत्र परंपरा असते. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय अस्वीकारार्ह आहे’, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात