पुणे : प्राचीन काळी मनुष्याला हितावह ठरतील अशा तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास केला गेला. प्रत्येक भागातील नैसर्गिक स्थिती, तेथील साधनसामग्री आणि आवश्यकता यांचा विचार करून स्थानिक पातळीवर तंत्रज्ञान वापरले गेले. सध्याचे तंत्रज्ञान हे युरोप, अमेरिकेच्या वातावरणाला उपयुक्त आहे; परंतु भारतासाठी नाही. यासाठी आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून आपल्याला योग्य तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे. पूर्वीच्या काळी दूरदृष्टीने ऋषिमुनींनी ते उपयोगात आणले आणि लिहून ठेवले; पण आज ते ग्रंथ उपलब्ध नाहीत, असे उद्गार यंत्रशास्त्राचे पदवीधर श्री. विजय उपाध्याय यांनी नुकतेच येथे काढले. डॉ. चिं.ना. उपाख्य श्री. बंडोपंत परचुरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित ‘प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘ज्ञानप्रबोधिनी’चे श्री. यशवंतराव लेले प्रमुख पाहुणे होते; तसेच शिल्पकलेचे गाढे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकरही व्यासपिठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे पार पडला. या वेळी कार्यक्रम स्थळी प्राचीन तंत्रज्ञान विषयक फ्लेक्सही लावण्यात आले होते.
श्री. उपाध्याय पुढे म्हणाले की,
१. पुण्याचे सुप्रसिद्ध रावबहाद्दर कृष्णाजी विनायक वझे यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतल्यावर पुरातन ग्रंथांचा अभ्यास करायला प्रारंभ केला. लोकमान्य टिळकांनी त्यांना प्रोत्साहन दिले. तेव्हा त्यांनी नोकरी सोडून देऊन संपूर्ण जीवन शिल्पशास्त्र विषयक शोधकार्यासाठी वाहिले. त्यातून त्यांनी ४०० ग्रंथ संकलित केले, तर अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यातील काही ग्रंथ आज उपलब्ध आहेत. काही गहाळ झाले आहेत. ते शोधण्याचा आणि संकलित करून प्रकाशित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
२. त्याच समवेत हे लिखाण केवळ ग्रंथापुरते मर्यादित न राहता त्याचा व्यावहारिक स्तरावर उपयोग होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संस्कृतच्या प्राध्यापिका डॉ. लीना हुन्नरगीकर या वेळी म्हणाल्या की, सध्या जे विज्ञान आणि तंत्रज्ञान शाळा महाविद्यालयांत शिकवले जाते, ते ब्रिटिश पद्धतीनुसार आहे; परंतु आपले प्राचीन विज्ञान पुष्कळ प्रगत होते. १५ व्या शतकात अर्वाचीन तंत्रज्ञान, तंत्रज्ञ (इंजिनीअर) हे शब्द प्रचलित झाले आणि त्याचा विकास झाला; मात्र भारतीय संस्कृतीत वेद काळापासून ते उपलब्ध होते. वेद, उपवेद, ब्राह्मण्य आदी ग्रंथांत ते विस्तृतपणे मांडले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रामुख्याने अथर्ववेदात दिले आहे. त्याचा अनुभव आणि अनुभूती ऋषीमुनींनी घेतलेली आहे, असे संस्कृतचा अभ्यास करतांना मला जाणवले.