सांगली येथे एकदिवसीय अधिवक्ता अधिवेशन !
सांगली : सध्याच्या काळात विविध घटनांमधूनहिंदुत्वाचे कार्य करणार्या कायकर्त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे, असेच दिसते. अशा खच्चीकरण झालेल्या हिंदुत्वनिष्ठांसाठी अधिवक्त्यांनी संरक्षण कवच म्हणून कार्य करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आपल्याला ५ सहस्र अधिवक्त्यांचे संघटन करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र तथा गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयात २ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या एकदिवसीय अधिवक्ता अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक तथा हिंदु जनजागृती समितीप्रणीत सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत चव्हाण यांनी केले. या अधिवेशनाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी २२ अधिवक्ता उपस्थित होते.
प्रारंभी हिंदु महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ. स्मिता कानडे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. या अधिवेशनात दुपारच्या सत्रात सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्मशास्त्र’ या विषयावर ‘पॉवर पॉईंट’द्वारे मार्गदर्शन केले.
या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले की,
१. आताचे सगळे कायदे हे स्वातंत्र्यपूर्व काळातील असून त्यातील बहुतांश कायदे हे क्रांतीकारकांचे दमन करण्यासाठी वापरण्यात येत होते. हेच कायदे आज हिंदूंचे दमन करण्यासाठी वापरण्यात येतात. स्वतंत्र झालेल्या भारतासाठी भारताचे ‘स्व’ (स्वत:चे) तंत्र का नाही ?
२. कोणतीही दंगल झाल्यास धर्माधांसाठी कायदे वेगळे आणि हिंदूंना कायदे वेगळे, अशीच आजची स्थिती आहे.
३. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५६५ संस्थाने विलीन करण्यापूर्वी आणि ४२ वी घटनादुरुस्ती करण्यापूर्वी संविधानिक मार्गाने जे अधिकार हिंदूंना होते, ते त्यांना मिळालेच पाहिजेत आणि त्यासाठीच आपले प्रयत्न आहेत.
अधिवक्त्यांनी मंदिर सरकारीकरण, तसेच सामाजिक क्षेत्रात होणार्या भ्रष्टाचाराविषयी आवाज उठवावा ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
सरकारीकरण झालेल्या हिंदूंच्या अनेक मंदिरांमध्ये आज भ्रष्टाचार होत आहे, अनियमितता आहे. यातील अनेक भ्रष्टाचार हिंदु विधीज्ञ परिषदेने कायदेशीर मार्गाने लढा देऊन बाहेर काढले आहेत. परिषद सध्या सामाजिक क्षेत्रात होणार्या भ्रष्टाचारासाठीही लढा देत आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा न मिळणे, तसेच अन्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे अधिवक्त्यांनी मंदिर सरकारीकरण, तसेच सामाजिक क्षेत्रात होणार्या भ्रष्टाचाराविषयी आवाज उठवावा. आपण सर्व अधिवक्ता असण्यासमवेत राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी एक दायित्व असलेले नागरिकही आहोत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी अधिवक्त्यांनीही पुढाकार घ्यायला हवा.
क्षणचित्रे
- या अधिवेशनाचे फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे हा विषय २० सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला.
- प्रदर्शनस्थळी फॅक्ट प्रदर्शन, तसेच सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याला अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
- अधिवेशनात हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या कार्याची ध्वनीचित्र तबकडी दाखवण्यात आली.
गटचर्चेत उपस्थित अधिवक्त्यांनी व्यक्त केलेली मते
मार्गदर्शनानंतर उपस्थित अधिवक्त्यांसाठी गटचर्चा घेण्यात आली. गटचर्चेत अधिवक्त्यांनी अधिवेशनात शिकायला मिळालेली सूत्रे सांगून यापुढील काळात कृतीच्या स्तरावर ते काय करणार याविषयी मनोगत व्यक्त केले.
१.अधिवक्ता प्रकाश खोंद्रे, कोल्हापूर – वकिली साहाय्यासाठी मला कधीही दूरभाष करा, एक अधिवक्ता म्हणून जे जे साहाय्य लागते ते सर्व मी करेन
२. अधिवक्ता मोहन कुंभार – माहिती अधिकारासाठी काम करणार्या कार्यकर्त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करेन. उपप्रादेशिक परिवहन खाते, तसेच अन्य खात्यांमध्ये नागरिकांची होणारी पिळवणूक थांबली पाहिजे.
३. अधिवक्ता अण्णा जाधव – जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा प्रसंगी रात्री १ वाजताही त्यांना साहाय्य करण्यासाठी मी सिद्ध असतो आणि यापुढील काळातही हिंदूंवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा मी हिंदूंना साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेईन !
४. अधिवक्ता श्रीपाद होमकर – हिंदुत्वनिष्ठांना अटक झाल्यावर त्यांना त्वरित वकिली साहाय्य मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे प्रभावी संघटन उभे राहिले पाहिजे.
५. अधिवक्ता (सौ.) मनीषा माने – प्रत्येक मासांत किमान दोन माहितीच्या अधिकारातील आवेदन देण्याचे ध्येय घेईन, तसेच वर्षभरात अधिकाधिक माहितीच्या अधिकाराचे आवेदन देण्यासाठी प्रयत्न करेन.
६. अधिवक्ता पाटील-पुजारी – आज ज्याप्रमाणे आपण एकत्र आलो त्याप्रमाणे सातत्याने एकत्र येणे आवश्यक आहे. लोकांना काहीतरी करण्याची इच्छा आहे; आपण त्यांना दिशा दिली पाहिजे. संघटित झालेल्या लोकांसाठी सभा घेण्याचाही विचार व्हावा. ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.
वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यास राखप्रतिबंधक यंत्र बसण्यास भाग पाडले ! – अधिवक्ता राजाराम यमगर
वसंतदादा शेतकरी सहकारी कारखान्याच्या धुराड्यातून निघणारी राख गेली अनेक वर्षे नागरिकांना त्रासदायक ठरत होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत होता. या संदर्भात स्थानिक ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच अन्य प्रशासकीय कार्यालयात पाठपुरावा करूनही दाद दिली गेली नाही. या संदर्भात मी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याची नोटीस दिली, त्याचीही नोंद घेण्यात आली नाही. अंतिमत: कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाला दिलेल्या कायदेशीर नोटिसेनंतर प्रशासनाला तो कारखाना ७२ घंटे ‘सील’ करावा लागला. यानंतर कारखान्याला साडेबावीस कोटी रुपये व्यय करून राख प्रतिबंधक यंत्र बसवण्यास भाग पडले. अशा प्रकारे एक अधिवक्ता लढा देऊन नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणार्या समस्यांसाठी आधारस्तंभ ठरू शकतो.
विविध खात्यांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी विभागनिहाय वकिलांच्या समित्या नेमून प्रत्यक्ष कृती करू शकतो.