त्यागामुळेच आनंदप्राप्ती होते ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे
रामनाथी (गोवा) : ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना तन, मन आणि धन यांचा त्याग आवश्यक असतो. व्यवसायात वृद्धी होण्यासाठी मी हे करीन, त्यामुळे मला अमुक अमुक लाभ होईल, असे आपल्याला वाटत असते; मात्र ईश्वरप्राप्ती करण्यासाठी त्याग महत्त्वाचा असतो. त्यागातच खरा आनंद असून त्यागामुळेच आनंदप्राप्ती होते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.
३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत येेथील सनातनच्या आश्रमात उद्योगपती साधना शिबीर पार पडले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी सद्गुरु (डॉ.) पिंगळे बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे केंद्रीय समन्वयक श्री. नागेश गाडे हेही उपस्थित होते.
उद्योगपतींना विविध विषयांवर मार्गदर्शन
या शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत उद्योगपतींचे योगदान आणि उद्योजकांच्या कार्याची आगामी दिशा’, ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयांवर श्री. नागेश गाडे यांनी, ‘तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ या विषयावर कु. वृषाली कुंभार यांनी, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संकल्पित कार्य आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शोधकार्य’ या विषयावर कु. प्रियांका लोटलीकर यांनी, तर ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना आणि आवश्यकता’ या विषयावर सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. वाईट शक्तींच्या त्रासांचे लक्षण आणि आध्यात्मिक उपाय या संदर्भातही माहिती देण्यात आली. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांवर होणारे आरोप अन् वास्तव या संदर्भात सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी शंकानिरसन केले. शिबिराच्या समारोप सत्रात शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केले.
मनोगत
१. हिंदु धर्माने ‘ईश्वरप्राप्ती करण्यासाठी मानवाने प्रयत्न करायला हवेत’, असे सांगितले आहे. या शिबिरात ईश्वरप्राप्ती होण्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत ?, मनाचा दृढनिश्चय कसा असावा ?, हे शिकायला मिळाले. मनाची शांती येथे अनुभवता आली. – श्री. अजित आव्हाळे, पुणे
२. आश्रमात आल्यावर मोह-मायेपासून दूर झाल्यासारखे वाटले. हे शिबीर आणखी काही दिवस चालले, तरी मी येथे थांबू शकतो. – श्री. विकास सावंत, सोलापूर
३. महाभारताच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगून जे ज्ञान दिले, ते संजयाला दिव्यदृष्टीमुळे पहाता आले. ते ज्ञान शिबिराच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळाले, असे मला वाटले. – श्री. राजीव तिवारी, वाराणसी.
४. मागील काही वर्षे साधक मला सनातन आश्रमाला भेट देण्याविषयी सांगत आहेत; मात्र वेळ उपलब्ध नसल्याने मी येऊ शकलो नाही. या वेळी दृढनिश्चय करून आश्रमात आलो. आश्रमात आल्यावर येथील नियोजनबद्धता आणि साधकांच्या तोंडवळ्यावरील आनंद पाहून चांगले वाटले. धर्मासाठी मला शक्य तेवढे मनापासून अर्पण करीन. – श्री. विनय विठलकर, शिरसी, कर्नाटक
५. कुटुंबीय मला या शिबिराला जाण्याविषयी सांगत होते; पण मी व्यावसायिक व्यस्ततेचे कारण सांगून ते टाळत होतो. शिबिरात आल्यावर पुष्कळ शिकायला मिळाले. – के.एन्. कृष्णमूर्ती, बेंगळूरू