Menu Close

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् यांनी अनुभवलेली हिंदूंची विदारक स्थिती !

श्री. मरवनपुलावु सच्चिदानंदन् हे श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ, तसेच हिंदु समाज आणि मंदिरे यांचे रक्षण करणार्‍या शिवसेनाई या संघटनेचे संस्थापक असून त्यांनी साधनेद्वारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेली आहे. श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

१. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून विरोध करणार्‍या हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव !

मी १७ सप्टेंबर २०१८ या दिवशी श्रीलंकेतील एका दुर्गम भागात असलेल्या कात्तैय्यादम्पण चेत्तीरामामाकन् या गावात काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसह गेलो होतो. तेथील एका पडक्या मंदिरात हिंदु भाविक भगवान शिवाचा नामजप करत होते. जप संपल्यावर ते आमच्या सभोवती जमले आणि त्यांच्या व्यथा सांगू लागले.

एका वृद्ध महिलेने सांगितले, त्या गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी बलपूर्वक हिंदूंचे धर्मांतर चालवले आहे. गावातील ५० हिंदु कुटुंबांपैकी १५ कुटुंबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांना अन्न, कपडे आणि घर यांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले; मात्र ३५ हिंदु कुटुंबांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्या गावात ख्रिस्त्यांनी एक चर्चही उभे केले आहे. दुसरीकडे हिंदूंजवळ एकमात्र पडक्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठीही पैसे नाहीत. त्या गावात अत्यंत हलाखीच्या स्थितीत हिंदू जगत असले, तरी त्यांचा स्वाभिमान जागृत आहे. या गावात हिंदु पुजार्‍यांना दक्षिणा मिळत नसल्याने तेही येथे येत नाहीत.

२. सरकारी शाळेत ख्रिस्ती धर्माचे शिक्षण; मात्र हिंदूंना धर्माचरण करण्यास बंदी !

या गावात हिंदु धर्माची माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध नाहीत. शाळकरी मुले जवळच्या शासकीय शाळेत जातात. तेथे ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य आहे. मुलांना विभूती लावणे आणि मुलींना बांगड्या घालणे यांवर बंदी आहे. मुलांच्या हातातील लाल दोरे कापून टाकण्यात येतात. काही पालकांनी याची तक्रार शिक्षणाधिकार्‍यांकडे केल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिकेने या पालकांच्या मुलांना शिक्षा करण्यास चालू केले. शासकीय शाळेत ख्रिस्ती धर्माचे शिक्षण देण्यात येते; मात्र हिंदु धर्माचे शिक्षण कुणीही देत नाही.

३. गावात हिंदूंना धर्माची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करण्यासाठी केलेले प्रयत्न !

मी तेथूनच जर्मनीतील एका ओळखीच्या व्यक्तीला दूरभाष करून श्रीलंकेतील कात्तैय्यादम्पण चेत्तीरामामाकन् या गावात पाठवण्यासाठी हिंदु धर्माची माहिती देणारी पुस्तके पाठवण्याची विनंती केली आणि ती त्याने मान्य केली. हे ऐकताच जमलेल्या हिंदूंचे चेहरे आनंदित झाले. मी त्यांना एक लघुउद्योग चालू करण्याची आणि त्यातून येणार्‍या पैशात मंदिराची दुरुस्ती करण्याची सूचना केली. ती सर्वांनी मान्य केली, तसेच त्यांनी मनातील भीती काढून टाकण्याचे आवाहन केले. ईश्‍वर आपल्या समवेत आहे, असे सांगितले. नंतर कार्यकर्त्यांसमवेत मी एका हिंदूच्या घरी गेलो. तेथील एका तरुण मुलीने धर्मांतर केले होते. तिचे मन वळवून तिला आम्ही परत हिंदु धर्मात आणले. घरावर लावण्यासाठी एक नंदीध्वज दिला.

४. श्रीलंकेतील हिंदूंच्या लोकसंख्येत घट, तर ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत वाढ !

श्रीलंकेत गेल्या १२ वर्षांत ख्रिस्ती लोकसंख्या ४४ टक्क्यांनी वाढली आणि हिंदूंची लोकसंख्या १६ टक्क्यांनी न्यून झाली. सुमारे ४०० वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी श्रीलंकेतील मन्नार येथे पाऊल ठेवले आणि हिंदूंचे धर्मांतर करण्यास प्रारंभ केला. तेव्हाच्या हिंदु राजाने ४०० धर्मांतरितांचा शिरच्छेद केला. आजही पेसालाई गावात प्रार्थना करून या धर्मांतरितांना श्रद्धांजली वाहिली जाते; मात्र ४०० वर्षांपूर्वी बंदुकीच्या टोकावर चालू झालेले धर्मांतर आज अन्न, कपडे आणि घरे देऊन चालूच आहे.

५. शिवसेनाई संघटनेचा ख्रिस्त्यांकडून होणार्‍या धर्मांतराला विरोध !

लिबरेशन टायगर ऑफ तमिल इलमच्या (एल्.टी.टी.ई.च्या) विरोधातील युद्ध संपल्यानंतर गेल्या ७ वर्षांत तेथे हिंदूंच्या धर्मांतराला अधिक वेग आला. वर्ष २०१६ मध्ये आम्ही धर्मांतराच्या विरुद्ध लढा देण्यासाठी शिवसेनाई संघटना स्थापन केली. त्यामुळे धर्मांतर करणार्‍यांच्या उरात धडकी बसली. आमचे स्वयंसेवक गावोगाव फिरू लागले. त्यांनी गावागावांत लावलेले क्रॉस काढले. मंदिरांना जाणार्‍या रस्त्यांवर उभे केलेले अडथळे दूर केले. ख्रिस्त्यांनी धमकी देऊन बंद केलेले हिंदूंचे सण साजरे करणे पुन्हा चालू केले. गावागावांतील हिंदूंच्या घरासमोर नंदीध्वज उभे केले. चर्चच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात शिवसेना संघटनेच्या विरोधामुळे नवीन भागात करण्यात येणार्‍या धर्मांतराच्या कार्यात अडचणी येत आहेत, याची स्वीकृती दिली. या भागात ६ सहस्र हिंदु कुटुंबे रहातात. त्या सर्वांना धर्मांतराचा धोका आहे. चर्चच्या जवळ युरोप आणि अमेरिका येथून येत असलेला प्रचंड निधी उपलब्ध आहे. या निधीचा दुरुपयोग हिंदूंचे मानसिक धैर्य नष्ट करण्यासाठी होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *