कारवार (कर्नाटक) : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकर्ण येथील श्री महाबळेश्वर मंदिर १९ सप्टेंबर या दिवशी उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने कह्यात घेतले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम आदेशानुसार परत श्री रामचंद्रपूर मठाच्या प्रशासनाकडे सोपवले आहे. श्री रामचंद्रपूर मठाचे प्रमुख श्री राघवेश्वर भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून ‘सत्यमेव जयति’ अशी प्रतिक्रिया दिली. श्री महाबळेश्वर मंदिर अनेक वर्षे विश्वस्तांच्या व्यवस्थापनाकडे होते; मात्र १२ ऑगस्ट २००८ या दिवशी तत्कालीन भाजप सरकारने ते रामचंद्रपूर मठ मंदिराच्या व्यवस्थापनाकडे सोपवले. गेल्या महिन्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने मंदिराचे व्यवस्थापन धर्मादाय विभागाकडे देण्याचा आदेश दिला होता; मात्र या आदेशाला उच्च न्यायालयाने १ मास प्रलंबित ठेवले होते. त्या कालावधीत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देतांना मठाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात