शबरीमला मंदिराचे प्रकरण
थिरुवनंतपूरम् : सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिल्यानंतर केरळ राज्यात ठिकठिकाणी हिंदूंकडून उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निर्णयाच्या कार्यवाहीच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी ८ ऑक्टोबरला मंदिराचे ३ मुख्य पुजारी आणि पंडालम् राजपरिवार यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
१. केरळ सरकारमधील देवस्वम् खात्याचे मंत्री कडाकमपल्ली सुरेंद्रन् म्हणाले की, आम्ही सर्व संबंधित व्यक्तींची भेट घेत आहोत. त्याद्वारे आमचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या कार्यवाहीसाठी कटीबद्ध आहे, हे त्यांना सांगणार आहोत. (मशिदींवरील अवैध भोंगे काढण्याचाही सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा निर्णय दिलेला आहे. या निर्णयांचे पालन लोकशाहीद्वारे निवडूून आलेले साम्यवादी सरकार कधी करते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) काही राजकीय पक्ष मतांसाठी या निर्णयाला विरोध करून अडचणी निर्माण करत आहेत; मात्र यात ते यशस्वी होणार नाहीत. (केरळचे साम्यवादी सरकारही मतांसाठीच या निर्णयाची कार्यवाही करण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. ६ ऑक्टोबरला पंडालम् राजपरिवाराचे वंशज ससिकुमार वर्मा आणि शबरीमला मंदिराचे मुख्य पुजारी राजीवारू कंदारारू यांनी कोट्टायम् ते चंगानारासेरी येथे आयोजित एका निषेधफेरीत भाग घेतला होता. यात सहस्रो लोकांनी सहभाग घेतला होता. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. फेरीतील सहभागी हिंदू भगवान अय्यप्पांचा नामजप करत होते.
३. या वेळी पुजारी कंदारारू म्हणाले की, आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अद्याप बैठकीचे कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही. न्यायालयाच्या निर्णयाने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. फेरीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होऊन सांगत आहेत की, आम्ही मंदिरात प्रवेश करणार नाही; मात्र काही हटवादी लोक म्हणत आहेत की, सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश दिला पाहिजे; मग त्यासाठी काहीही झाले तरी चालेल. (मशिदींमध्ये महिलांना प्रवेश नाही. त्यासाठी कोणी न्यायालयात जात नाही आणि त्यांच्या प्रवेशासाठी काहीही झाले, तरी चालेल; पण प्रवेश मिळाला पाहिजे, असे कुणीही म्हणत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
बैठकीला उपस्थित रहाण्यास पुजारी आणि राजपरिवार यांचा नकार
सायंकाळी उशिरा मुख्य पुजारी आणि राजपरिवार यांनी मुख्यमंत्री पिनरायी विजयन् यांनी ८ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित रहाण्यास नकार दिला आहे. ‘जोपर्यंत केरळ सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका प्रविष्ट करत नाही, तोपर्यंत सरकारशी चर्चा करणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
एर्नाकुलम् (केरळ) येथे नामजपघोष यात्रा : हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
कडवंत्रा (एर्नाकुलम्, केरळ) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदू आणि त्यांच्या संघटना जात, पक्ष आदी भेद विसरून एकत्र येऊन केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. येथे ठिकठिकाणी नामजपघोषयात्रा काढण्यात येत आहेत. यांत मुले आणि पुरुष यांच्यासमवेत महिलांची संख्याही लक्षणीय आहे. याच अनुषंगाने ६ ऑक्टोबरला एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंत्रा येथे नामजपघोष यात्रा काढण्यात आली.
‘सेव्ह शबरीमला’ (शबरीमलाचे रक्षण करा !) या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली. यात सुमारे ३०० हिंदू सहभागी झाले होते. यात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. ‘स्वामिये शरणम् अय्यप्पा’ असा नामजप सहभागी झालेले हिंदू करत होते. यात्रेच्या शेवटी मान्यवरांनी त्यांची मते मांडली. ‘न्यायालयाचा निर्णय हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असून तो पालटायला हवा, या विषयी सर्व हिंदू मतभेद विसरून एकत्र आले पाहिजेत, अन्यथा धर्मावरील आघात असेच वाढत जाणार’, असे विचार या वेळी मान्यवरांनी मांडले.
‘सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वी हिंदु धर्माचार्य किंवा शबरीमला तंत्री (शबरीमला मंदिराचे पुजारी) यांचे मत किंवा त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असेही विचार अनेकांनी मांडले.
क्षणचित्रे
१. नामजपघोष यात्रा चालू होण्यापूर्वी खूप पाऊस पडत होता. तरीही हिंदू वेळेत एकत्र जमा झाले.
२. या यात्रेची सांगता झाली त्या ठिकाणी आकाशात गरुड फिरत होता. (राज्यात अन्यत्र झालेल्या नामजपघोष यात्रेच्या वेळीही गरुड फिरतांना दिसले.)
३. केरळमधील सर्व नामजपघोष यात्रांमध्ये आतापर्यंत प्रचंड मतभेद असलेले २ मोठ्या जाती संघटना मतभेद विसरून एकत्र आले आहेत. त्याचसमवेत साम्यवादी, काँग्रेस, भाजप आदी राजकीय पक्षांतील हिंदू एकत्र येत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात