सोलापूर येथे अधिवक्ता बैठक
सोलापूर : आतापर्यंत केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. शासनाने मंदिरातील चुकीच्या व्यवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते; मात्र सरकारीकरणानंतर मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारच होत आहे. मंदिरे ही हिंदूंची ऊर्जास्रोत आहेत. ते नष्ट करण्याचे काम सरकार करत आहे. राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी अधिवक्ता या नात्याने आपले दायित्व म्हणून कार्य करणे आवश्यक आहे. धर्मासाठी केलेले कोणतेही कार्य अनादी अनंत काळ टिकते. त्यामुळे यशाची चिंता नको; कारण हिंदूंच्या यशाचा इतिहास आहे. माहिती अधिकाराअंतर्गत कारवाई होण्यास प्रारंभ झाल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक तथा हिंदु जनजागृती समितीप्रणीत सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले. येथे झालेल्या अधिवक्ता बैठकीत ते बोलत होते. बैठकीनंतरच्या चर्चात्मक सत्रात १ मासातून अधिवक्त्यांची बैठक घेण्याचे निश्चित झाले. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या कार्याची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.
या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी पंढरपूर आणि तुळजापूर येथील मंदिरांतील भ्रष्टाचाराविरोधात हिंदू विधीज्ञ परिषदेने दिलेला लढा अन् त्याला लाभलेले यश यांविषयी सविस्तर माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी समितीचे कार्य आणि हिंदूंवर होत असलेले विविध आघात यांची माहिती दिली, तसेच ‘आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांचे योगदान आवश्यक आहे’, असेही त्यांनी सांगितले.
अधिवक्त्यांचे मनोगत
अधिवक्ता लक्ष्मण मारडकर – राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविरोधात अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक आहे.
अधिवक्ता दीपक केसकर – राष्ट्र-धर्म यांसाठीच्या स्तुत्य कार्यासाठी अधिवक्त्यांनी वेळ काढायलाच हवा.
अधिवक्ता प्रवीण उत्तरकर – बैठकीतून योग्य दिशा मिळाली. धर्माचे कार्य करतांना अधिवक्त्यांमध्ये संकुचितपणा नको, तर समर्पण वृत्ती आवश्यक आहे, हेही लक्षात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात