चेन्नई : येथील चेतपुटमधील शंकरालयम् येथे ४ ऑक्टोबर २०१८ या दिवशी ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक श्री. अर्जुन संपथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ‘तमिझागा पाधुकप्पू कोट्टमेप्पु’ची (तमिळनाडू सुरक्षा मंचाची) स्थापना करण्यात आली. तमिळनाडूमधील जातीवर आधारित सर्व संघटनांना एका छत्राखाली आणण्याच्या उद्देशाने या मंचाची स्थापना करण्यात आली आहे.
या बैठकीत पुदिया थमिझागम् पक्षाचे अध्यक्ष डॉ. कृष्णस्वामी, कोंगु पंथाचे श्री. देवराजन्, कोंगु मक्कल मुन्नानीचे मुख्य समन्वयक श्री. अरुमुगम्, श्री. गोपाल रमेश गौंडर, तम्ब्रासचे अध्यक्ष श्री. एन्. नारायणन्, व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष श्री. मुथुकुमार, देवार तिरुमगनार संघटनेचे श्री. गणेशन्, तमिळनाडू नादर संगमचे श्री. मुथुरमेश नादर, सौ. उमा आनंदन्, श्री. आईरपोर्ट मूर्ती, श्री. वेट्टावलम मणिकंदन् आणि दुग्ध ग्राहक संघटनेचे श्री. पोन्नुस्वामी सहभागी झाले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. काशिनाथ शेट्टी हेही या बैठकीत सहभागी झाले होते. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी समाजाच्या सद्यस्थितीविषयी माहिती सांगतांना हिंदुविरोधी राजकीय पक्षांच्या युतीमागचा दुष्ट हेतू उघड केला. हिंदूंनी संघटित होऊन हिंदु धर्माचे रक्षण करणे, ही काळाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या बैठकीला ५० हून अधिक जण उपस्थित होते. अशी बैठक प्रतिमास घेण्याचे या वेळी ठरवण्यात आले.
या बैठकीत खालील महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले.
१. विघटनवादी आणि कट्टरवादी शक्तींना विरोध करणे, हिंदूंचे धार्मिक विधी आणि परंपरा यांमध्ये हस्तक्षेप न करण्याची सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणे.
२. हिंदूंचे धार्मिक विधी आणि परंपरा, विशेष करून शबरीमला मंदिराविषयी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, यासाठी संसदेत कायदा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती करणे.
३. तिरुनेलवेली येथे भरणार्या ‘तमिळबरानी पुष्कर मेळ्या’ला सुरक्षा पुरवण्याची तमिळनाडू सरकारला विनंती करणे, ‘इस्लामिक स्टेट’ने तमिळनाडूमध्ये त्याचे जाळे पसरवले आहे. त्याविषयी जागृती करणे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात