श्री दुर्गामाता दौडीला उत्साहात प्रारंभ
सांगली : जगातील १८६ राष्ट्रांपैकी ७६ राष्ट्रांनी भारतावर आक्रमण केले. आजही भारतीय सैनिक चीन-पाकिस्तानच्या सीमेवर भारतमातेच्या रक्षणासाठी गोळ्या खाऊन मृत्यूमुखी पडत आहेत. भारताच्या अशा शत्रूंचे निर्दालन झाले पाहिजे. नुसत्या भौतिक सुखाच्या लालसेत जगणारी पिढी आपल्याला नको आहे, तर देशासाठी प्रसंगी प्राण समर्पित करणारे युवक भारतमातेला हवे आहेत. ‘भारतमातेचा उद्ध्वस्त संसार दुरुस्त करण्यासाठी आम्हाला शक्ती दे’, असे मागणे मागण्यासाठी आपण श्री दुर्गामातेच्या पायाशी आलो आहोत, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीसाठी श्री दुर्गामाता मंदिरासमोर जमलेल्या धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम शिवतीर्थ, मारुति चौक येथून दौड प्रारंभ झाली. यानंतर श्री दुर्गामाता मंदिरापर्यंत येऊन शहरातील विविध मार्गांवरून जाऊन परत शिवतीर्थासमोर समाप्त झाली. दौडीत राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत करणारी गीते म्हणण्यात येत होती, घोषणा देण्यात येत होत्या. भगवे फेटे, अग्रभागी डौलाने फडकणारा भगवा ध्वज, धारकर्यांचा अपार सळसळता उत्साह यांमुळे सकाळप्रहरी सांगलीत नवचैतन्य निर्माण झाले होते. ठिकठिकाणी दौडीचे स्वागत करण्यात आले.
दौडीच्या प्रारंभी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. संगीता खोत यांनी भगवा ध्वज पकडला आणि त्या काही काळ दौडीत सहभागी झाल्या होत्या.
बत्तीस शिराळा (जिल्हा सांगली) : प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही येथे दुर्गामाता दौडीला उत्साहात प्रारंभ झाला. दौडीत महिला आणि मुली यांचाही समावेश होता. पहाटे ५.४५ वाजता मारुती मंदिरापासून ही दौड चालू झाली. विविध मार्गांनी जाऊन शेवट गुरुवार पेठेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सांगता झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात