जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद यांच्या मृत्यूचे प्रकरण
प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी १११ दिवस उपोषण करून त्याची नोंद जगातील मोठी लोकशाही असणार्या देशात घेतली जात नाही, हे संतापजनक आहे. त्यांच्या मृत्यूस भारतीय शासनकर्ते आणि प्रशासन उत्तरदायी आहेत. यास उत्तरदायी असणार्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
वाराणसी – जी व्यक्ती सकाळी चांगल्या स्थितीत होती आणि ती स्वतःच्या हाताने प्रसिद्धीपत्रक बनवते, १११ दिवस तपस्या करून आश्रमात असतांना चांगली असते; मात्र एम्स रुगणालयात नेल्यावर एकाच रात्रीत तिचे निधन होते, असे कसे होऊ शकते? त्यांनी स्वतः त्यांच्या शरिरातील पोटॅशियमचे प्रमाण दूर करण्यासाठी गोळ्या आणि इंजेक्शन यांद्वारे पोटॅशियम घेण्याचे मान्य केलेले असतांना त्यांचा मृत्यू कसा होतो ? त्यामुळे आम्हाला निश्चित वाटते की, स्वामी सानंद यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा श्रीविद्यामठाचे महंत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद यांच्या मृत्यूविषयी केला आहे. स्वामी सानंद हे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे शिष्य होते. स्वामी सानंद यांनी २२ जूनपासून गंगानदीला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे आमरण उपोषण चालू केले होते. त्यांना १० ऑक्टोबरला पोलिसांनी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात बलपूर्वक भरती केले होते आणि त्यानंतर त्यांना देहली येथे नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.
गंगानदी वाचवण्याचे अभियान थांबणार नाही !
गंगानदीसाठी आमच्या पूर्वजांनी बलीदान केले आहे आणि आजही गंगाभक्त तिच्यासाठी काही करण्यास मागे रहाणार नाहीत. हे सरकार जर यातून असा संदेश देऊ इच्छिते की, जो कुणी गंगानदीसाठी आवाज उठवेल, त्याची हत्या केली जाईल, तर स्वामी सानंद यांच्या निधनानंतरही गंगानदी वाचवण्याचे कार्य चालूच राहिल, हे त्याने जाणावे, असा निर्धार स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केला.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या मागण्या
१. स्वामी सानंद याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात यावे; कारण आम्हाला शंका आहे की, त्यांची हत्या करण्यात आली आहे.
२. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी सीबीआयला सांगावे.
३. त्यांचा मृतदेह काशी हिंदु विश्वविद्यालयाला सोपवा; कारण त्यांनी आमच्याशी बोलतांना त्यांचा देह काशी हिंदु विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळावा, असे म्हटले होते.
स्वामी स्वानंद यांचा परिचय
२० जुलै १९३२ या दिवशी उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील कंधाला गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी आयआयटी रुरकी येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. कॅलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी अभियांत्रिकीत पीएच्डी केली. नंतर आयआयटी कानपूरमध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
प्रा. जी.डी. अग्रवाल गंगानदी वाचवण्यासाठी १०९ दिवस उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ?
इतर वेळी नट-नटींच्या भानगडी आणि त्यांच्याशी निगडित इतर वायफळ वृत्तांना भरघोस प्रसिद्धी देणार्या प्रसारमाध्यमांनी प्रा. जी.डी. अग्रवाल हे आमरण उपोषण करत असतांना त्याविषयी १ दिवसही वृत्त दाखवले नाही ! प्रसारमाध्यमांना हे वृत्त ‘ब्रेकिंग न्यूज’ वाटले नाही का ? हे संवेदनशील वृत्त प्रसारमाध्यमांनी उचलून धरले असते, तर त्यातून लोकजागृती होऊन सरकारवर कार्यवाही करण्यासाठी नक्कीच दबाव निर्माण झाला असता आणि कदाचित् प्रा. जी.डी. अग्रवाल यांचे प्राणही वाचले असते ! स्वतःचे दायित्व विसरलेली प्रसारमाध्यमे देशहित काय साधणार ?
प्रा. जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी ज्ञानस्वरूप सानंद
- यांनी गंगानदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारले होते !
- गंगानदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्राणत्याग करणारे प्रा. जी.डी. अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर आणखी एक खुलासा !
- ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ?
- ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान मोदी यांनी काय कार्यवाही केली ?’, याचे उत्तर त्यांनी जनतेला देणे अपेक्षित आहे !
नवी देहली – गंगानदी वाचवण्यासाठी आमरण उपोषण करतांना मृत झालेले प्रा. जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांनी गंगानदीच्या अस्तित्वाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये पत्र लिहून फटकारले होते. हे पत्र त्यांनी सार्वजनिक केले होते. या पत्रात त्यांनी लिहिले होते, ‘वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तुम्हीही ‘मी माता गंगेचा समजदार, लाडका आणि मातेला समर्पित असणारा पुत्र आहे’, असे सांगत होता. ही निवडणूक माता गंगा आणि प्रभु श्रीराम यांच्या कृपेने जिंकून तुम्ही मातेचे काही लालची आणि भोगी लोकांमध्ये अडकलात. त्या नालायकांसाठीच्या भोगाची साधने (वीजप्रकल्प इत्यादी) गोळा करण्याला तुम्ही विकास म्हणू लागलात. तुम्ही वृद्ध गंगामातेला जलमार्गाद्वारे हमाली करणारे खच्चर (प्राणी) बनवू इच्छिता. तुमच्या सरकारने ‘गंगानदी मंत्रालय’ स्थापन केल्यावर आशा निर्माण झाली होती; मात्र गेल्या ४ वर्षांत ती आशा धारातिर्थी पडली. यामुळे येत्या ‘गंगा दशहरा’ म्हणजे २२ जूनपासून निर्णायक आमरण उपोषण चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.’ स्वामी स्वानंद यांनी लिहिलेल्या या पत्राची पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही नोंद घेतली नाही आणि शेवटी त्यांचा उपोषण करतांनाच मृत्यू झाला. काँग्रेसच्या काळातही त्यांनी याचसाठी अडीच मास उपोषण केले होते. आता त्यांनी उपोषण आरंभल्यावर केंद्रीयमंत्री उमा भारती आणि नितीन गडकरी यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती. गंगेचा प्रवाह अविरत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १० ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली; पण ११ ऑक्टोबरला त्यांचे निधन झाले.
गंगा आणि अन्य नद्या यांवरील विद्युत्निर्मिती योजनांना विरोध
स्वामी स्वानंद यांनी गंगानदीवर बनणार्या विद्युत् योजनांचा विरोध केला होता. यामुळे गंगानदीचा र्हास होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी याविषयी ‘गंगा नदी कायदा’ बनवण्याची मागणी केली होती. त्या व्यतिरिक्त उत्तराखंडमधील भागीरथी, मंदाकिनी, अलकनंदा, पिंडर, धौली गंगा आणि विष्णु गंगा नदी यांवरील विद्युत्निर्मिती योजना रहित करण्याची मागणी केली होती. तसेच गंगाक्षेत्रातील वृक्षतोड आणि उत्खनन यांवरही बंदी घालण्याची मागणी केली होती. भागीरथी नदीवरील धरणाचे बांधकाम थांबवण्यासाठी त्यांनी वर्ष २००९ मध्ये उपोषण केले आणि त्यांना यशही मिळाले. ते गंगा महासभेचे संरक्षकही होते. गंगा महासभेची स्थापना पं. मदनमोहन मालवीय यांनी वर्ष १९०५ मध्ये केली होती. शेवटच्या काळात ते महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापिठात पर्यावरण विज्ञान विषयाचे मानद प्राध्यापक होते.
स्वामी सानंद यांनी त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान केला
स्वामी सानंद यांनी त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर एम्स रुग्णालयाला दान करण्याचे पत्र लिहिले होते. त्यामुळे त्यानुसार त्यांचा मृतदेह एम्सकडे सुपुर्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.
गंगानदीसाठी प्राणत्याग करणारे मातृसदन आश्रमाचे गंगापुत्र !
देहराडून – गंगानदीला वाचवण्यासाठी स्वामी स्वानंद यांनी प्राणत्याग केला, तसा प्राणत्याग यापूर्वीही दोन जणांनी केला आहे. यात स्वामी निगमानंद सरस्वती आणि स्वामी गोकुलानंद यांचा समावेश आहे. स्वामी निगमानंद आणि स्वामी गोकुलानंद हे दोघेही मातृसदन आश्रमाशी संबंधित होते. तसेच स्वामी सानंदही याच आश्रमातील होते.
१. स्वामी निगमानंद सरस्वती यांनी गंगानदीसाठी ११४ दिवस आमरण उपोषण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी गंगानदीमधील उत्खननावर बंदी घालण्याची मागणी केली होती. १३ जून २०११ या दिवशी देहरादून येथील जॉलीग्रांट रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतरही ‘ही हत्या होती’, असा आरोप करून त्याची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र सरकारने ती केली नाही.
२. स्वामी गोकुलानंद यांनीही गंगानदीतील उत्खननाच्या विरोधात स्वामी निगमानंद यांच्यासमवेत आंदोलन केले होते. त्यांनीही आमरण उपोषण केले होते. त्यानंतर ते वर्ष २०१३ मध्ये एकांतवासामध्ये गेले. काही काळानंतर नैनीताल येथील बामनी येथे त्यांचा मृतदेह सापडला होता. ‘त्यांना विष देऊन मारण्यात आले’, असा आरोप करण्यात आला होता; मात्र याची कोणतीही चौकशी झाली नव्हती.
प्रशासन, एम्सचे डॉक्टर आणि नितीन गडकरी हत्येला उत्तरदायी ! – स्वामी शिवानंद सरस्वती यांचा आरोप
ऋषिकेश येथील मातृसदन आश्रमाचे (याच आश्रमात स्वामी सानंद उपोषणाला बसले होते.) परमाध्यक्ष स्वामी शिवानंद सरस्वती यांनी ‘स्वामी सानंद यांची हत्या सरकारच्या आदेशाने करण्यात आली आहे. याला हरिद्वार जिल्हा प्रशासन, ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाचे डॉक्टर आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी उत्तरदायी आहेत. यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी’, अशी मागणी केली आहे. स्वामी शिवानंद सरस्वती असेही म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माता गंगानदीने यासाठीच बोलावले होते का की, तेगंगाभक्तांचे बलीदान घेत रहातील?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात