मुंबई : देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड येथे केले. राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या वतीने मुलुंड रेल्वे स्थानकासमोर आयोजित आंदोलनात ते बोलत होते. श्री. गणेश पाटील पुढे म्हणाले की, बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी देशभरातील चर्चची विशेष आयोगाद्वारे चौकशी करावी. देशात चालू असलेल्या अश्लील संकेतस्थळांवर कारवाई करावी. यामुळे लहान मुले आणि युवा पिढी वाया जाऊ लागली आहे. एकीकडे सोशल मीडियावर ‘मी टू’ मोहीम चालू आहे, त्याच वेळी दुसरीकडे सरकारकडे वारंवार मागणी करूनही अश्लील संकेतस्थळावर बंदी आणली जात नाही. हा विरोधाभास आहे. सरकारने हज यात्रेला अनुदान दिले; मात्र कुंभमेळ्याला जाण्यासाठीच्या रेल्वे तिकिटांवर अधिभार लावला आहे. हा अधिभार त्वरित रहित करावा, अशी मागणी श्री. गणेश पाटील यांनी या वेळी केली. साईलीला मित्र मंडळाचे श्री. सचिन घाग, धर्मप्रेमी श्री. नीलेश देशमुख यांचीही या वेळी भाषणे झाली. या वेळी शिवसेनेसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल या संघटनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
प्रतिक्रिया
१. तुम्ही करत असलेले काम चांगले आहे, यामुळे हिंदूंना त्यांचा हक्क मिळणार आहे. – कुसुम कुलकर्णी
२. हिंदुस्थानातच हिंदु सुरक्षित नाही. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे. – हर्षा जोशी
३. हिंदूंमध्ये जागृती आली पाहिजे. हिंदु आता जागृत होणार नाही, तर केव्हा जागृत होणार ? – जी.व्ही. वेद