(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे
राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्या सनातनवर आतापर्यंत एकही गुन्हा नोंद झालेला नसतांना तिला आतंकवादी संघटना म्हणून अपकीर्ती करणारे निखिल वागळे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !
मुंबई : ‘सनातनची बॉम्ब फॅक्टरी’ सापडल्यानंतर त्यांच्यावरील ‘फोकस’ दूर करण्यासाठी या ५ कार्यकर्त्यांना (नक्षलप्रेमींना) अटक करण्यात आली. सनातनला वाचवण्यासाठी सरकार हे करत आहे. तुम्ही ‘सीमी’वर बंदी घालता, डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालता. योग्य असेल, तर घाला; मात्र हे केवळ हिंदुत्ववादी आहेत म्हणून यांना का वाचवता ? ही आतंकवादी संघटना आहे. (सनातन संस्था ही अध्यात्माचा प्रसार करणारी संस्था आहे. तिची तुलना ‘सीमी’सारख्या आतंकवादी संघटनेशी किंवा देशद्रोह विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्याशी करणे, ही वागळे यांची बौद्धिक दिवाळखोरीच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आपण लावून धरली पाहिजे. ‘इंडिया टुडे’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये सनातनच्या साधकांनी ‘बॉम्ब प्लान्ट’ केल्याची स्वीकृती दिली, असे धादांत खोटे वक्तव्य तथाकथित पत्रकार निखिल वागळे यांनी केले. (या स्टिंग ऑपरेशनमध्ये श्री. मंगेश निकम आणि श्री. हरिभाऊ दिवेकर यांनी सांगितलेल्या वाक्यांची तोडमोड करून ‘स्टिंग ऑपरेशन’चा बनाव करण्यात आला. याविषयी निकम यांनी सामाजिक माध्यमांपुढे सत्य सांगितल्यावर ‘इंडिया टुडे’ आणि ‘आज तक’ या वृत्तवाहिन्यांचा खोटारडेपणा उघड झाला. ही पत्रकारिता म्हणजे पत्रकारितेला कलंक होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१२ ऑक्टोबर या दिवशी दादर माटुंगा येथील कल्चरल सेंटर येथे ‘मुंबई राइसेस टू सेव्ह’च्या वतीने पंतप्रधानांच्या हत्येच्या कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या नक्षलप्रेमींच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘अघोषित आणीबाणीच्या विरोधात जनपरिषद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात नक्षलवाद्यांशी संबंधित ‘इनोन्सस नेटवर्क’ या संस्थेचे अब्दुल वाहिद शेख, अधिवक्ता मिहिर देसाई, छत्तीसगड येथील आदिवासी हक्क कार्यकर्त्या सोनी सोरी यांच्यासह माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्यांच्या कुटुंबातील सदस्य या वेळी व्यासपिठावर उपस्थित होते.
निखिल वागळे पुढे म्हणाले, ‘‘यांनीपण (सनातनने) पहिले लक्ष्य सर्व प्रसारमाध्यमांना केले आहे. (सनातनने कधीही प्रसारमाध्यमांना लक्ष्य केलेले नाही. उलट ज्या माध्यमांनी सनातनची अपकीर्ती करण्यासाठी खोट्या बातम्या दिल्या, त्यांच्या विरोधात सनातनने कायद्यानुसार नोटिसा पाठवलेल्या आहेत, तसेच मानहानीचे खटले प्रविष्ट केले आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) माझा पोलिसांवर विश्वास नाही. यांच्यापेक्षा गुंड परवडले, असे पोलीस आहेत. एक-एक तक्रार करायला पोलीस ४ घंटे लावतात. पुणे येथील पोलीस तर भामटे आहेत. इतकी वर्षे अनुभव घेतल्यावर हे मी बोलत आहे.
सर्वोच्च न्यायालय बरे आहे; मात्र खालच्या न्यायालयांमधील न्यायाधीश काय पात्रतेचे आहेत ? त्यांना काही कळतच नाही. त्यांची बौद्धिक पात्रता नाही. (न्यायाधिशांचा अवमान करणारे वागळे यांच्यावर कोणी कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सर्वोच्च न्यायालयात गेलो, तरच न्याय मिळतो आणि तोही चांगला न्यायाधीश असेल तरच ! हल्लीच्या काळात तर संघाच्या शाखेवर जाणारेही न्यायाधीश झाले आहेत. न्यायव्यवस्थेचे चित्रही चिंताजनक आहे. तेथे न्याय मिळतो, हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.’’
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ‘इनोसंस नेटवर्क’ या संस्थेचे अब्दुल वाहिद शेख यांनी सीमी संघटनेवर चुकीच्या पद्धतीने बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करून एकप्रकारे आतंकवादी कारवायांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. (यावरून कथित जनपरिषद घेणारे कोणत्या विचारसरणीचे आहेत, हे लक्षात येते ! अशांवर सरकार काय कारवाई करणार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात