मुंबई : कारखाने आणि छोट्या छोट्या युनिटमध्ये काम करण्यासाठी बालकांची तस्करी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सादिक मन्सुरी, सुकेश्वर राऊत, एकलाक हसन, जाफर शेख, अब्दुल शेख यांना १३ ऑक्टोबर या दिवशी मुलुंड येथे अटक केली. त्यांच्या तावडीतून १३ ते १६ वर्षे वयोगटातील २१ जणांची सुटका करण्यात आली आहे. त्यातील ८ जण नेपाळमधील, तर १३ जण बिहारचे आहेत. ही मुले गरीब कुटुंबातील आहेत.
पालकांना पैशांचे आमीष दाखवून या मुलांना कर्मभूमी एक्स्प्रेसने मुंबईत आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. या सर्वांना डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पकडलेल्या टोळीतील अनेक आरोपी पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बालमजुरीच्या विरोधात काम करणार्या ‘प्रथम’ संस्था आणि ‘पालवी चाइल्डलाइन’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांना बिहार आणि नेपाळमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. या दोन्ही संस्थांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या बालसाहाय्यक पोलीस युनिटला दिली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. (मुलांची तस्करी करणार्यांना पोलीस स्वत:हून का शोधून काढत नाहीत ? स्वयंसेवी संस्थांनी माहिती दिल्यानंतर कारवाई करणारे पोलीस काय कामाचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात