‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवरील ‘जय रावण’ चर्चासत्रातील हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्यांचे प्रतिपादन !
मुंबई – नागपूर येथील जनार्दन मूल नावाच्या एका गृहस्थाने रावणाचे दहन करण्याला विरोध करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती. न्यायालयाने ही याचिका अत्यंत चुकीची आणि फुटकळ आहे. तसेच प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही याचिका प्रविष्ट केली आहे, असे ताशेेरे ओढले होते. ‘केवळ आणि केवळ हिंदूंच्या भावनांना हात घालण्यासाठीच आपण अशी याचिका प्रविष्ट करता का ?’, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. याचिकाकर्त्याची याचिका रहित करतांना त्यांना २५ सहस्र रुपयांचा दंडही केला आहे. कायद्याच्या दृष्टीने अशा प्रकारची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे. असे असूनही भीम आर्मी संघटनेने अशी मागणी करणे याला काहीच अर्थ नाही. तसेच अनेक वर्षांपासून चालू असलेली परंपरा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी या वेळी मांडले.
रावणाचा समावेश अभ्यासक्रमात करावा, तसेच दसर्याच्या दिवशी रावणदहन करू नये, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ या वाहिनीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पाटील यांनी केले. कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर आणि भीम आर्मी संघटनेचे महासचिव सुनील थोरात हे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,
१. रावण स्त्रियांशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागणारा होता. अयोग्य अशा राजाचे प्रतीकात्मक दहन केले जाते. ते यापुढेही दहन केले जाईल.
२. भीम आर्मी संघटना घटनेलाच आक्षेप घेत आहे, असे वाटते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भीम आर्मी संघटना निर्माण केली आहे. याच बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार दिला आहे.
३. रावणाचे उदात्तीकरण करणे अतिशय अयोग्य आहे. ज्याने स्वतःच्या कुळाचा नाश केला, त्याला ‘महात्मा’ म्हणणे अयोग्य आहे.
४. रावणाची माहिती अभ्यासक्रमात अंतर्भूत करून त्याचा विद्यार्थ्यांना काहीच लाभ होणार नाही. त्यामुळे रावणाची माहिती अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यासाठी आमचा विरोध आहे.
रावणाचे उदात्तीकरण करणार्या तळपट्ट्या कार्यक्रमात प्रसारित करणारी ‘जय महाराष्ट्र’ वाहिनी !
संपूर्ण चर्चासत्राचे प्रसारण होईपर्यंत ‘रावण खलनायक नाही’, ‘रावण पराक्रमी आणि तत्त्वशील राजा’, ‘आदिवासींचे कुलदैवत लंकापती रावण’, ‘रावण दशग्रंथी ब्राह्मण’, ‘रावणाने स्वबळावर राज्य निर्माण केले’, अशा तळपट्ट्या दाखवण्यात येत होत्या. (रावणाचे उदात्तीकरण करणार्या अशा वृत्तवाहिन्या कधी तरी समाजहित साधतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
(म्हणे) ‘रावणाचे पूजन दसर्याच्या दिवशी करणारच !’ – सुनील थोरात, महासचिव, भीम आर्मी संघटना
लक्ष्मणाला धडा शिकवण्यासाठी रावणाने सीतेला पळवून नेले; परंतु तिचा अवमान किंवा शीलभंग कधीच केला नाही, अशी आख्यायिका आहे. (रावणाला शाप होता; म्हणून त्याने सीतामातेला हात लावला नाही. त्याने स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांविषयी रामायणात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतात. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सीतेला पळवून नेले म्हणून रामाने रावणाची हत्या केली. रावणाला दहा तोंडे होती. ‘तो राक्षस होता’, अशी प्रतिमा रंगवून त्याला खलनायक ठरवले जात आहे आणि त्याचे दहन केले जात आहे. याविषयी भीम आर्मी संघटनेच्या वतीने आम्ही विरोध करत आहोत. तसेच रावण महात्मा असल्यामुळे आम्ही दसर्याच्या दिवशी रावणाची पूजा करणार आहोत.
सत्य इतिहास लपवून काल्पनिक इतिहास रचणारी भीम आर्मी संघटना !
१. मध्यप्रदेश, झारखंड, छतीसगढ, श्रीलंका तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथे १२ वर्षांपासून रावणाची पूजा केली जाते. तोे वाईट असतो, तर त्याची पूजा केली नसती. रावण हा आदिवासी समाजाचा पूर्वज असून आमचा एक शूर महामानव, महानायक, वीर पुरुष आहे म्हणून त्याची पूजा केली जाते. त्यांना अभिवादन आणि श्रद्धांजली देत असतो.
२. रावण उच्च कोटीचा विद्वान होता. दशग्रंथी ब्राह्मण होता. सांस्कृतिक संघर्षामध्ये आपली संस्कृती वाचवण्यासाठी लढणारा नायक म्हणून मोंड आदिवासीही रावणाची पूजा करत असतात.
३. महात्मा राजा रावण समृद्ध राजा होता. शिल्पकार होते. न्यायप्रविष्ट राजा होते. त्यांना चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर आणले आहे. दहा डोकी, असे चित्र उभे केले. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अतिशय घृणा तयार झाली.
(इतिहास विकृत पद्धतीने मांडल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, त्याचे हे उदाहरण आहे. आज प्रभु श्रीरामचंद्रांविषयी रावणाचे उदात्तीकरण करणारा समाज निपजतो, हे लोकशाहीचे अपयश होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सतीश कोचरेकर यांनी ठणकावले : दुर्जनतेचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन करणे योग्यच !
रावण विश्व ऋषींचा आणि कैकसी यांचा मुलगा असून तो दशग्रंथी ब्राह्मण होता. त्याला संस्कृतचे ज्ञान होते. त्याच्या मृत्यूनंतर सामवेदाचे पठण केले होते. सत्त्वशील सर्व गोष्टी होत्या; परंतु स्त्रियांवर अत्याचार करणे आणि त्यांना कमी लेखणे हे सत्यही समोर मांडायला हवे. ‘मला काय वाटते’, याला महत्त्व नाही. दुर्जनतेचे प्रतीक म्हणून रावणाचे दहन केले जाते ते योग्यच आहे. ‘हिंदु धर्मावर बोलण्याचा आणि त्यात ढवळाढवळ करण्याचा यांना अधिकार नाही’, असे न्यायालयाने सांगितले आहे. हिंदूंनी त्यांच्या धर्माचे पालन यथायोग्य आणि चांगल्या प्रकारे उत्साहाने करावे. ‘उद्या दाऊद, हाफिज सईद यांचा अभ्यासक्रमात समावेश करा’, अशी मागणी केली जाईल; कारण ते पाकिस्तानमधील लोकांना सहाय्य करत होते; परंतु असे असले, तरी त्यांनी भारतावर केलेल्या आक्रमणाचे सत्य लपून राहू शकत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात