Menu Close

रावणदहन योग्य कि अयोग्य ?

प्रभु श्रीरामांनी त्रेतायुगात अन्यायी आणि अधर्मी राजा रावण याचा वध केला. या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा मिळावी, तसेच दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे; मात्र सध्या काही संघटना ‘रावणदहन करणे चुकीचे आहे आणि त्याच्यावर बंदी घालायला हवी’, यासाठी आंदोलन करणे, निवेदन देणे आदींसह ‘रावणदहन होऊ देणार नाही’ अशा आक्रमक भूमिकाही घेतांना दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुढील सूत्रे देत आहोत.

रावणदहनाला विरोध करणारी मंडळी पुढीलप्रकारे काही तर्क मांडतात,

१. (म्हणे) ‘रावण हा आदिवासी गोंड समाजाचा राजा होता !’

हिंदूंची रावणदहनाची परंपरा आहे, ती त्रेतायुगातील राजा रावणाची आहे. रावण हा पुलस्त्य ऋषींचा नातू, तसेच विश्रवा आणि कैकसी यांचा पुत्र आहे. मुळातच ब्राह्मण कुटुंबातील रावण हा अतिशय विद्वान आणि वेदविद्यासंपन्न होता. त्याने कठोर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले होते.

एकाच नावाचे अनेक राजे वा राष्ट्रपुरुष होऊन गेले आहेत. या संघटना ज्या रावणाचा उल्लेख करत आहेत. त्यांच्यामते तो गोंड समाजाचा आदिवासी राजा रावण याच नावाचा असू शकतो; मात्र हिंदू ज्या रावणाचे दहन करतात, तो रावण गोंड समाजाचा राजा नक्कीच नाही.

२. (म्हणे) ‘रावणाचे दहन करून त्याचा अपमान केला जात आहे !’

रावण हा अतिशय विद्वान असूनही त्याचा वध का केला आणि त्याचा दहनाचा उत्सव का साजरा केला जातो, याचे कारण समजून घेतले पाहिजे. हिंदु धर्माचे महत्त्व येथे लक्षात येऊ शकते. व्यक्ती किती उच्चविद्याविभूषित असो, सामर्थ्यवान असो, राजघराण्यातील असो; पण जर ती व्यक्ती बलात्कारी असेल, जनतेवर अन्याय करणारी असेल, ऋषीमुनींची हत्या करणारी असेल, यज्ञयागांचा विध्वंस करणारी असेल, तर ती अधर्मीच असून दंडास पात्र आहे.

प्रभु श्रीरामांनी अशा रावणाचा वध करून दुर्जन प्रवृत्तीचाच वध केला, याचे प्रतिक म्हणून रावणदहनाची परंपरा चालू आहे.

३. (म्हणे) ‘सीताहरण सोडले, तर त्याने अन्य काही चुकीचे केले, असे आमच्या माहितीत नाही !’

प्रभु श्रीरामांची धर्मपत्नी सीतामातेचे रावणाने हरण केले होते. एखाद्याच्या पत्नीला बळजोरीने फसवून पळवून नेणे, हे दंडनीयच आहे. तरी या अक्षम्य अपराधाकडे दुर्लक्ष करणारी विधाने रावणदहनाला विरोध करणारी मंडळी करत आहेत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही मंडळी आदर्श मानतात, त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार जरी या प्रसंगाचा विचार केला, तरी परस्त्रीचे अपहरण करणे, फसवणूक करणे, डांबून ठेवणे आदी गंभीर गुन्ह्यांनुसार कठोर शिक्षा रावणाला मिळाली असती. अशा गंभीर अपराधाचे समर्थन कसे करता येईल ?

४. (म्हणे) ‘रावण महात्मा होते !’

हिंदूंच्या महान धर्मग्रंथांपैकी एक असलेल्या रामायणात उल्लेख केल्यानुसार रावणाने अनेक ऋषीमुनींची हत्या केली, यज्ञ उद्ध्वस्त केले, अनेक स्त्रियांवर अत्याचार केले आदी अनेक महापापे केली आहेत. गोंड राजा रावण महात्मा असल्याचे कोणतेही संदर्भ आज उपलब्ध नाहीत; मात्र लंकाधिपती रावण अन्यायी आणि क्रूर होता, याचे अनेक संदर्भ आज उपलब्ध आहेत. त्यामुळे बलात्कारी, हत्या करणारा, विध्वंस करणारा रावण महात्मा कसा असू शकतो ?

त्यामुळे अन्यायी राजा रावणाच्या दहनाची परंपरा आणि सध्या काही संघटना करत असलेला गोंड राजा रावणाचे उदात्तीकरण यांमध्ये काहीही साम्य किंवा तथ्य नाही. म्हणून रावणदहनाच्या कार्यक्रमांना होणारा विरोध हा अनाठायी आणि अयोग्य आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *