थिरुवनंतपूरम् : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध अद्यापही तितक्याच शक्तीने चालू आहे. भाजपने गेल्या ५ दिवसांपासून पंडालम ते थिरुवनंतपूरम् असा मोर्चा काढला. त्याचा शेवट थिरुवनंतपूरम् येथील मंत्रालयासमोर झाला. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. श्रीधरन् पिल्ले सहभागी झाले होते. (केंद्रातील भाजप सरकारने न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अध्यादेश काढून मंदिराची परंपरा कायम राखावी, यासाठी केरळमधील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते दबाव का आणत नाहीत ? मोर्चे आणि विरोध करून भाजपकडून केवळ मतांची सोय केली जात आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. पिल्ले म्हणाले की, भाविक किती नाराज आहेत, हे यातून दाखवायचे होते. केरळ सरकार न्यायालयाचा निर्णय घाईघाईने लागू करण्याचा प्रयत्न करून हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळत आहे. आम्ही त्रावणकोर देवस्वम् मंडळाकडून काहीही अपेक्षा करत नाही. कारण ते सत्ताधारी माकपची कठपुतळी आहे. (माकपवर टीका करणार्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या याविषयी निष्क्रीय असणार्या केंद्र सरकारवरही टीका करण्याचे धाडस दाखवावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. भाजपचे खासदार सुरेश गोपी म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढाई लढतील. कारण अनेक युगांपासून चालू असलेली ही परंपरा कायम ठेवली जावी. (जर ही परंपरा युगांपासून चालू आहे, हे भाजपच्या खासदारांना माहिती आहे आणि रोखण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश काढू शकते, तर तसे करण्यास सांगत का नाही ? केवळ अशा प्रकारची विधाने करून काय साध्य होणार आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
कमल हासन यांचा या विषयावर बोलण्यास नकार
अभिनेता आणि ‘मक्कल सुधी मायाम’ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कमल हासन यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की, ‘हा न्यायालय आणि भक्त यांच्यातील प्रश्न आहे. मी केवळ दर्शक आहे. मी यावर ‘नो कॉमेंट्स’ असेही म्हणणार नाही.’ (हिंदु भाविकही मतदानाच्या वेळी या पक्षाला मत देण्याविषयी आणि त्यांचे चित्रपट पहाण्यापूर्वी विचार करतील, हेही कमल हासन यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात