मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या राज्यघटनेमध्येच धर्मस्वातंत्र्य, प्रचारस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य दिले आहे. हे कदाचित डॉ. आंबेडकर यांचे नाव घेणारे आदर्श घोटाळ्यासाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र आव्हाड यांना माहिती नसावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन प्रतिकात्मक केले होते; मात्र त्याच बाबासाहेबांनी २४ फेब्रुवारी १९४९ यादिवशी संविधान निर्माती सभेसमोर भाषण करतांना म्हटले होते, ज्या १३७ लोकांनी स्मृति लिहिल्या आहेत, त्यामध्ये मी उल्लेखलेल्या याज्ञवल्क्य आणि मनु या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत. असे असतांना विनाकारण मनुस्मृतीवर बंदी घातल्याचा खोटारडेपणा करून आव्हाड ज्या दुकानांमध्ये ती विक्रीसाठी असेल, त्या दुकानांची तोडफोड करू, अशी धमकीची भाषा करत आहेत. हाच का त्यांचा गांधीवाद ? प्रत्यक्षात आव्हाड यांनी केवळ घटनेने दिलेले लेखनस्वातंत्र्य तर संकटात आणले आहेच, त्याशिवाय ते आतंकवादी असलेल्या इशरतजहाँला शहीद म्हणून घटनाद्रोहच करत आहेत, असे परखड मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
मनुस्मृतीचा कोणताही अभ्यास न करता तिच्यावर टीका करणे, हे अविवेकी आहे. महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात मनुस्मृतीने सर्वांत आधी महिलांना संपत्तीतील चौथा हिस्सा दिला आहे, याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कौतुकही केले आहे. केवळ जातीयवादी विचारसरणी समाजात पेरणार्या आव्हाडांना मनु ब्राह्मण नव्हता, हे तरी माहीत आहे का ? मनु हा इश्वाकु वंशातील राजा होता. वेदाध्ययनाद्वारे कायदा आणि न्यायव्यवस्था यांविषयी आदर्श कसे हवे, यासाठी त्याने मनुस्मृति हा ग्रंथ लिहिला होता. इंग्रजांनी त्याचा चुकीचा अनुवाद पसरवून भारतात जातीयवाद निर्माण होईल, असे प्रयत्न केले आणि आव्हाडांसारखी माणसे हे प्रयत्न यशस्वी झाल्याचेच दर्शवतात. देशात भारतकी बर्बादी आणि पाकिस्तान झिंदाबाद म्हणणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजले जाते; मग मनुस्मृति विकणे आणि वाचणे, हे त्यात बसत नाही का, असा सनातन संस्थेचा प्रश्न आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात