शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरण
डोंबिवली : तुम्हाला किती लोकांना हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांविषयी माहिती आहे ? धर्मग्रंथांतील विचार वर्षानुवर्षे चालू आहेत. एका झटक्यात ते बदलू शकत नाहीत. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे होत नाही; त्यांच्यावर अन्याय झाला की ते एकत्र येतात. आपण हिंदू मात्र एकत्र येऊन अन्यायाचा विरोध करत नाही. आपल्या मुलांना आपली संस्कृती समजून सांगायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला विरोध करण्याची शक्ती मिळते. आम्ही वारंवार सांगत आहोत की, आपण एकत्र यायला पाहिजे; हिंदू राज्यांत विभागले गेले आहेत. आपला धर्म एक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माचे पालन करणे हेे आपले कर्तव्य आहे; आपण एकत्र येऊ आणि अन्यायाच्या विरोधात शेवटपर्यंत लढा देऊ, असे प्रतिपादन प.पू. कृष्णानंद सरस्वती यांनी केले. ते शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरणी काढलेल्या निषेध फेरीनंतर येथील अयप्पा मंदिरात ते बोलत होते.
शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात डोंबिवली येथे भव्य निषेध फेरी
डोंबिवली येथे खंबाळपाडा मंदिर, ठाकुर्ली आणि हिंदू ऐक्य वेडी बीजेपी साउथ इंडियन सेल, कल्याण या संघटनांच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अय्यप्पा मंदिराचे २०० हून अधिक भक्तगण एकत्र आले होते. ही फेरी ठाकुर्ली येथील हनुमान मंदिर येथून निघून अय्यप्पा मंदिर, खंबाळपाडा येथे विसर्जित करण्यात आली. या वेळी बीजेपी साऊथ इंडियन सेल, कल्याणचे अध्यक्ष मोहन नायर, हिंदु ऐक्यवेदी कल्याणचे उदयकुमार आणि राजेश नायर, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदन, तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस मुरली नायर उपस्थित होते. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या प्रतिनिधींनी यात सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात