कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रद्धेचा भाग असलेले प्राचीन मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ बुजवून तेथे थेट शौचालय बांधण्याचे दुष्कर्म पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे. ही श्री महालक्ष्मीच्या कोट्यवधी भाविकांच्या, तसेच कोल्हापुरातील समस्त नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत संतापजनक आणि धार्मिक भावना दुखावणारी कृती आहे. पुरातत्व कायद्यानुसारही हा दखलपात्र गुन्हा आहे. या संदर्भात १५ एप्रिल २०१३ या दिवशी तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी हे शौचालय हटवण्याचे आदेश दिले होते; परंतु त्या आदेशाचे अद्यापही पालन झालेलेच नाही. या संदर्भात ३१ ऑगस्ट २०१५ या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषदेने पुन्हा तक्रार केली; मात्र परिस्थिती अद्यापही जैसे थे आहे.
पुरातत्व खात्यानेही याविषयी काहीही केले नाही. या सर्व प्रकाराला उत्तरदायी असणारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त, तसेच महापालिका आयुक्त यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, असे निवेदन सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ९ मार्च या दिवशी जुना राजवाडा येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल देशमुख यांनी हे निवेदन स्वीकारले. (पवित्र अशा मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोलीस ठाण्यात निवेदन देणार्या सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी कर्नाटक येथील श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक, बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु एकताचे जिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत बराले, शहरप्रमुख श्री. जयदीप शेळके, श्री. शिवाजीराव ससे, श्री. जयदीप शेळके, हिंदुत्ववादी श्री. जयकुमार खडके, श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवैध बांधकाम होत असतांना देवस्थान समितीच्या सदस्यांनी डोळ्यांवर झापड ओढली होती का ? – प्रमोद मुतालिक
या वेळी पोलीस निरीक्षकांशी चर्चा करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, अवैध बांधकाम होत असतांना देवस्थान समितीच्या सदस्यांनी डोळ्यांवर झापड ओढली होती का ? या बांधकामाचा समितीशी काहीच संबंध नाही का ? हे कुंड देवस्थान समितीच्या परिसरात येत असल्याने समितीच्या पदाधिकार्यांना याचे दायित्व झटकता येणार नाही.
संभाजी साळुंखे म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून देवस्थान समितीला पूर्णवेळ अध्यक्ष मिळू नये, हे दुर्दैवी आहे.
श्री. महेश उरसाल म्हणाले, हिंदुत्ववाद्यांवर आंदोलनाची वेळ आणू नका.
ज्यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहे, अशांची नावे
१. डॉ. अमित सैनी, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
२. राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे माजी आमदार, आटपाडी आणि सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
३. हिरोजी परब, सिंधुदुर्ग, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
४. बी.एन्. पाटील-मुगळीकर, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
५. प्रमोद पाटील, इचलकरंजी, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती
६. सौ. संगीता उदय खाडे, सदस्य, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका
७. या सर्वांना साहाय्य करणारे आणि /किंवा वर नमुद केलेल्या गुन्ह्यांना कारणीभूत असणारे ज्ञात अन् अज्ञात आरोपी
विषय कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगून दायित्व झटकणारे पोलीस अधिकारी !
या वेळी चर्चा करतांना पोलीस निरीक्षक म्हणाले, हा विषय माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ. त्यावर श्री. सुनील घनवट म्हणाले, हा विषय चर्चेचा नसून धार्मिक भावनांशी संबंधित असल्याने संबंधित सर्वांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावेत; कारण हा विषय तुमच्याच अख्यारितील आहे.
या वेळी पोलीस ठाण्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचेे अभियंता श्री. देशपांडे उपस्थित होते. त्यांनी हे कुंड २० वर्षांपूर्वी आम्ही महापालिकेला हस्तांतरीत केले आहे. त्यामुळे याच्याशी आमचा संबंध नाही, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला.
याविषयीच्या पत्रकार परिषेद झालेली काही प्रश्नोत्तरे
१. या वेळी एका पत्रकाराने हसन मुश्रीफ यांच्यावर तुम्ही जातीय दृष्टीकोनातून आरोप करत आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देतांना श्री. अभय वर्तक म्हणाले, आजपर्यंत समितीने कधीही कोणावरही जातीय दृष्टीकोनातून आरोप केलेले नाहीत. उलट स्वत:ला देवीभक्त म्हणवून घेणारे हसन मुश्रीफ यांना आमचे आवाहन आहे की, त्यांनी पुढाकार घेऊन हे अवैध बांधकाम हटवावे.
२. २० वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेवर हसन मुश्रीफ यांची सत्ता नव्हती, तसेच शहराचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर असतांना तुम्ही केवळ मुश्रीफ यांच्यावरच का आरोप करत आहात, या प्रकरणासाठी तुम्हाला अन्य कोणी उत्तरदायी वाटत नाही का ?
याचे उत्तर देतांना श्री. सुनील घनवट म्हणाले, मुश्रीफ यांचे नाव आम्ही केवळ आम्ही उदाहरणादाखल एक लोकप्रतिनिधी म्हणून घेतले आहे. या प्रकरणाशी जे जे संबंधित आहेत, त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी कृती समितीची भूमिका आहे. गेली अनेक वर्षे कोल्हापूर महापालिकेत कोणाची सत्ता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत, हे जगजाहीर आहे. त्यामुळे आज आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीशी संबंधित प्रत्येकावर कारवाई होण्यासाठी तक्रार दिली आहे. सध्या महापालिकेत हसन मुश्रीफ यांचीच सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नेते या नात्याने हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून हे अवैध बांधकाम पाडून का टाकत नाहीत ?
३. तुम्ही हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करतांना तुमच्याकडे पुरावे आहेत का ?
यावर उत्तर देतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, समोर दिसणार्या गोष्टींसाठी पुराव्यांची आवश्यकता काय ? तुम्ही नेते आहात, तर या गोष्टींचे उत्तरदायीत्वही तुमचेच आहे.
या वेळी श्री. अभय वर्तक म्हणाले, भारत देशात सर्वच पुरातन वस्तूंच्या जपणुकीविषयी अनास्था आहे. मग ते गडकोट असो वा मंदिरे अथवा अन्य काहीही. आपल्या पुरातन गोष्टींचे संवर्धन हा विषयच नाही. आपल्याकडे असलेली अनेक पुरातन मंदिरे लक्ष न दिल्याने नष्ट होत आहेत. हे सर्व आपल्या पुढच्या पिढीला मिळावे यांसाठी आमची धडपड आहे. भारतात असलेली मंदिरे हा अतुलनीय असा चिरंतन ठेवा आहे. त्याकडे पुरातत्व खात्यापासून कोणाचेच लक्ष नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात