जळगाव : येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले. आंदोलनाप्रसंगी पुढील मागण्या करण्यात आल्या.
१. चर्चमध्ये होणारे लैंगिक शोषण आणि बलात्कार या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करावी.
२. भुसावळ येथे मोठ्या प्रमाणात सापडलेल्या गोवंश प्रकरणातील मुख्य आरोपींचा छडा लावून त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्या आबिद पाशा आणि त्याच्या टोळीवर ‘कोका’द्वारे कारवाई करण्यात यावी आणि ही टोळी चालवणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर त्वरित बंदी घालण्यात यावी.
४. प्रयाग कुंभमेळ्यासाठी रेल्वेने येणार्या भाविकांवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त अधिभार लावण्याचा घेतलेला निर्णय सरकारने त्वरित रहित करावा.
५. अनैतिक आणि अवैध धंदे, जुगार, अमली पदार्थ, मानवी तस्करी आदी अनेक गोष्टींवर प्रतिबंध आणण्यासाठी ‘ऑनलाईन’ वेश्या व्यवसाय चालवणार्या संकेतस्थळांवर बंदी आणावी या मागण्या करण्यात आल्या. शेवटी सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांना देण्यात आले.
देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती
गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमधील लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार सतत समोर येत आहेत. केरळच्या चर्चमधील एका ननवर बिशप फ्रँको मुलक्कल याने १३ वेळा बलात्कार केल्याचे उघड झाले. अशा कितीतरी घटना देशात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्थांची चौकशी करण्यासाठी एक विशेष आयोग नेमावा. काही दिवसांपूर्वीच भुसावळ शहरातील मिल्लतनगर परिसरातील मो. कुरेशी याच्या घरावर धाड टाकून पोलीस प्रशासनाने ९५ गोवंशियांची सुटका केली. महाराष्ट्रात ‘गोवंश हत्याबंदी’ कायदा लागू असतांना त्याची कोणतीही तमा न बाळगता, एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश एका घरात डांबून ठेवणे, हे काही एकट्या-दुकट्याचे काम नाही. तरी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलीस प्रशासनाने मुख्य आरोपींचा छडा लावावा आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केली.
या आंदोलनास हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अधिवक्ता गोविंद तिवारी आणि श्री. श्रेयस पिसोळकर यांनीदेखील संबोधित केले. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, हिंदु महासभा यांसह अन्य समविचारी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी अन् हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.