थिरुवनंतपूरम् : शबरीमला मंदिर उघडे रहाण्याचा २२ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले जात होते. या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत मंदिर उघडे रहाणार होते. भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही. मल्ल्याळम् पंचांगानुसार दर मासाचे पहिले पाच दिवस मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते.
शबरीमला प्रकरणातील पुनर्विचार याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता !
शबरीमला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करणार्या तब्बल १९ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २३ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सर्व वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची परंपरा योग्यच ! – ९ वर्षीय मुलगी
सर्व वयोगटांतील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया जननी नावाच्या ९ वर्षांच्या मुलीने व्यक्त केली. या मुलीने शबरीमला येथे येऊन ‘माझे वय ९ वर्षे असून मी शबरीमला मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आणखी ४१ वर्षे वाट पहाण्यास सिद्ध आहे’, अशा आशयाचे वाक्य असलेला फलक हातात धरला होता. (जो समजूतदारपणा एक लहान मुलगी दाखवते, तो स्वतःला मोठे म्हणवणारे पुरो(अधो)गामी, नास्तिक आदी दाखवत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याविषयीचे छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारीत झाले आहे. ‘आपल्या धार्मिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश मला लोकांना द्यायचा आहे’, असेही तिने सांगितले.
केवळ ९ महिलांकडून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न !
मंदिर उघडल्यापासून ५ दिवसांत ९ महिलांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. इतर सहस्रो महिलांनी मात्र प्रथा-परंपरांचे पालन करण्यास प्राधान्य दिल्याचे निदर्शनास आले. (यावरून हिंदू त्यांच्या धार्मिक परंपरा पाळण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सिद्ध होते ! सर्वत्रच्या हिंदूंसाठी हा आदर्शच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात