नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्वच चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष आयोग नेमावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विद्याधर जोशी यांनी केली. २० ऑक्टोबर या दिवशी नागपूर येथील संविधान चौक येथे हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. चर्चमधील अपप्रकार आणि कुंभमेळ्याच्या तिकिटांवरील अतिरिक्त अधिभार याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी विविध संघटनांच्या वतीने विषय मांडण्यात आले. चर्च, पाद्री, अन् बिशप आदींचे खटले जलद गती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी केंद्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
१४ जानेवारी २०१९ पासून चालू होणार्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांवर तिकिटांचा अतिरिक्त अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्रात हिंदूंवरच हा अन्याय का ?’ असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. अनैतिक आणि अवैध धंदे, जुगार, अमली पदार्थ, मानवी तस्करी आदी अनेक गोष्टींवर प्रतिबंध आणण्यासाठी ऑनलाईन वेश्याव्यवसाय चालवणार्या संकेतस्थळावर बंदी आणावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या करणारा अबिद पाशा आणि त्याच्या टोळीवर ‘कोका’द्वारे कारवाई करण्यात यावी, तसेच ही टोळी चालवणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशविघातक संघटनेवर बंदी आणावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी केली.
या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. या वेळी संबंधित मागण्यांच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. सही करणार्या हिंदु धर्माभिमान्यांनी समितीच्या कार्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली.
२. रस्त्यावरून दुचाकीने जाणारे किंवा बसमधील प्रवासी यांनीही आंदोलनाची छायाचित्रे काढली.