हिंदु धर्मात फूट पाडून लिंगायतांना वेगळे करण्याचे काँग्रेसी षड्यंत्र उघड !
बेळगाव : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी शिव-उपासक असणार्या लिंगायतांना वेगळे करण्याचे आणि त्यांचा स्वतंत्र धर्म घोषित करण्याचे षड्यंत्र रचले होते. प्रत्यक्षात लिंगायतांना हे षड्यंत्र लक्षात आल्याने त्यातून काँग्रेसची हानीच झाली आणि निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला झिडकारले. आता याची उपरती झाल्याने काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी ‘लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याची घोषणा करणे, ही आमच्याकडून झालेली चूक आहे. जनतेने आम्हाला क्षमा करावी’, असे वक्तव्य केले आहे.
या संदर्भात डी.के. शिवकुमार यांनी हे उघडपणे मान्य केले असले, तरी केवळ क्षमायाचना करून भागणार नाही, तर या षड्यंत्राचे प्रमुख शिल्पकार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे हायकमांड यांनी बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहून क्षमायाचना करून केंद्राला पाठवलेली लिंगायत स्वतंत्र धर्माची शिफारस परत घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी केली. ते कन्नड साहित्य भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधी आणि धर्माभिमानी सौ. मनीषा कनकनमेली आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर उपस्थित होते.
या वेळी श्री. गुरुप्रसाद गौडा पुढे म्हणाले, ‘‘केवळ वरवरची क्षमा मागून उपयोग नाही; कारण हिंदु जनता आता या षड्यंत्राला भुलणार नाही आणि क्षमाही करणार नाही. काँग्रेसची परंपरा पाहिली असता ब्रिटिशांप्रमाणे त्यांचीही ‘फोडा आणि राज्य करा’, अशीच नीती दिसून येते. आता मात्र जाती, प्रांत यांच्या आधारावर हिंदूंना फोडण्याचे षड्यंत्र सहन केले जाणार नाही; म्हणून काँग्रेसने सिद्धरामय्या यांना बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोर उघडपणे क्षमायाचना करण्यास भाग पाडून केंद्राला पाठवलेला प्रस्ताव परत घ्यावा, अशी आमची मागणी आहे.’’
या वेळी लिंगायत समाजाच्या प्रतिनिधी आणि धर्माभिमानी सौ. मनीषा कनकनमेली म्हणाल्या, ‘‘१२ व्या शतकात हिंदु समाजातील सर्व घटकांना संघटित करण्यासाठी अनुभव मंटप स्थापन केले आणि आता तुम्ही त्याला तोडण्याचा प्रयत्न करत आहात. हिंदु धर्म एक मोठा वृक्ष आहे. त्याच्या फांद्या कापल्या, तर झाडाला त्रास होणे स्वाभाविकच आहे.’’