शबरीमला प्रकरण हे कम्युनिस्टांचे षड्यंत्र ! – टी.बी. शेखर, ‘शबरीमला अयप्पा देव समिती’, कर्नाटक
हुब्बळ्ळी (कर्नाटक) : शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्या केवळ ४ – ५ महिलांसाठी ४ – ५ कोटी भक्तांना दुखवणे योग्य नव्हे. सदर महिला भक्तीपोटी हे करत नव्हत्या, तर त्यांचा प्रवेश हे हिंदु विरोधकांचे, तसेच कम्युनिस्टांचे फार मोठे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन शबरीमला अय्यप्पा देव समिती’चे श्री. टी.बी. शेखर यांनी येथे केले. शबरीमला प्रकरणात ‘शबरीमला अय्यप्पा देव समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. अनुमाने १ सहस्र अय्यप्पाभक्त यात सहभागी झाले होते. ‘केवळ शबरीमलाच नव्हे, तर हिंदूंच्या सर्वच श्रद्धास्थानांवर आघात करण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे. हिंदूंनी आता तरी सावध झाले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी ‘शबरीमला अय्यप्पा देव समिती’चे कर्नाटक राज्याचे उपाध्यक्ष श्री. आनंद गुरुस्वामी, तालुकाध्यक्ष श्री. जी. मोहन गुरुस्वामी, धारवाड जिल्हा उपाध्यक्ष श्री बसवराज पट्टणशेट्टी गुरुस्वामी, हुब्बळ्ळी येथील राजविद्याश्रमाचे नवचेतन भारतभूषण श्रो.ब्र. षड्क्षरी महास्वामीजी, तसेच अमलझरी येथील शिवशक्ती मठाचे श्री शरीफ शिवयोगी शास्त्री उपस्थित होते. या आंदोलनात चिक्कोडी, बेळगाव, दावणगेरे, तुमकुरू, हावेरी, यल्लापूर, कुंदगोळ, धारवाड आदी दूरच्या ठिकाणांहून भक्तगण सहभागी झाले होते. आंदोलनाच्या आयोजकांकडून हिंदु जनजागृती समितीलाही निमंत्रण देण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
क्षणचित्रे
१. श्री. आनंद गुरुस्वामींनी शबरीमलाचा महिमा लोकांना सांगितला.
२. या वेळी महिला प्रतिनिधी म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विदुला हळदीपूर यांना व्यासपिठावर पाचारण करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या भाषणात हिंदूंवर होणार्या आघातांविषयी माहिती सांगून उपस्थितांमध्ये जागृती केली.
३. हिंदु जनजागृती समितीला वेगवेगळ्या ठिकाणी होणारी आंदोलने, सभा आदी ठिकाणी हा विषय मांडण्यासाठी आवाहन करण्यात आले.
४. सभेपूर्वी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले.
शास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्यातच मानवाचे हित ! – श्री शरीफ शिवयोगी शास्त्री
या वेळी श्री शरीफ शिवयोगी शास्त्री म्हणाले, ‘‘धर्म प्रत्येकाला आधार देतो. जाती म्हणजे धर्म नव्हे. आज जातीच्या आधारेच हिंदु धर्मात फूट पाडली जात आहे. परिणामी हिंदू संघटित होत नाहीत. अय्यप्पा ही ब्रह्मचर्याची देवता आहे. त्यामुळे सर्वच महिला तेथे जाऊ शकत नाहीत. ‘तेथे का जाऊ नये ?’, असे उद्धटपणे प्रश्न विचारून तेथे गेल्यास आपलीच हानी होणार आहे. यासाठी संबंधितांनी त्यांच्या अतीबुद्धीचा वापर न करता आपल्या, तसेच समाजाच्या भल्यासाठी शास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे. त्यात सर्वांचे हित आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात