Menu Close

विघटनवादी शक्तींच्या विरोधात जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठांचा बुक्का मोर्चा !

जळगाव : देशविघातक विचार पसरवून युवकांची माथी भडकवणार्‍या कन्हैया कुमारसारख्यांवर कारवाई होण्यासाठी येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच, हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २५ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात आला. शहरातील स्वामी विवेकानंद बहुउदेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री. कैलास सोनवणे, राष्ट्रीय सुरक्षा मंचचे श्री. किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली बळीराम पेठ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याला १ सहस्र ५०० हून अधिक महाविद्यालयीन युवक उपस्थित होते.

या मोर्च्यात भाजपचे आमदार सुरेश भोळे, महापौर सौ. सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, राष्ट्रीय सुरक्षा मंचचे श्री. सचिन नारळे, बजरंग दलाचे श्री. ललित चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, महानगरपालिका शिवसेना गटनेते श्री. सुनिल महाजन यांच्यासह शहरातील क्रीडा संस्था, मित्र मंडळाचे पदाधिकारी, शिवसेना अन् भाजपचे आजी-माजी नगरसेवक, विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आतंकवादाचे उदात्तीकरण करणार्‍या मीडियाचा जाहीर निषेध ! – किशोर शितोळे, राष्ट्रीय सुरक्षा मंच

सैनिकांवर दगडफेक आणि संसदेवर आक्रमण करणार्‍यांचे तसेच आतंकवादाचे उदात्तीकरण करणार्‍या मीडियाचा आम्ही जाहीर निषेध करतो. युवकांचा बुद्धीभेद करून आतंकवादाला खतपाणी घालण्याचे मोठे षड्यंत्र राबवले जात आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना जामीनही मिळू नये, अशी तरतूद करण्यात यावी. यासाठी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

विद्यापिठांतील देशद्रोही आणि विघटनवादी शक्ती ठेचून काढण्यासाठी मोर्च्याचे आयोजन ! – कैलास सोनवणे, संस्थापक अध्यक्ष, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था, जळगाव

समारोपप्रसंगी श्री. कैलास सोनवणे म्हणाले की, विविध विद्यापिठांतील देशद्रोही आणि विघटनवादी शक्तींचा बिमोड करण्यासाठी जळगाव येथून आरंभ करत आहोत. या विद्यार्थ्यांना सर्व सवलती, अनुदान मिळूनही येथून जर आतंकवादी निपजले जात असतील, तर अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत. यासाठीच या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *