हिंदूंच्या परंपरा जपण्यासाठी विशेष कायदा करण्याची ‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’ची मुंबई येथील पत्रकार परिषदेत मागणी
मुंबई : आमची आई, बहीण सुखरूप रहाण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. धर्म नाही, तर काही नाही. धर्म नाही, तर जीवन संपल्यासारखे आहे. त्यामुळे हिंदूंच्या प्रथा-परंपरा सांभाळणे सरकारचे कर्तव्य आहे. केरळमध्ये शबरीमला आंदोलनात कोणी नेता किंवा पक्ष नाही, तर लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण आहेत. तेथे बहुसंख्य हिंदू आहेत; पण तेथे मतपेटीसाठी ख्रिस्ती मते मिळावीत; म्हणून त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. केरळात साडेतीन सहस्र जणांना अटक केली आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. जणूकाही तिथे हिटलरचे राज्य चालू आहे. आमच्या शेकडो मंदिरांतील परंपरांवर घाला घालण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत झाला आहे, तो हाणून पाडण्यासाठी केंद्र सरकारने हिंदूंच्या परंपरांच्या रक्षणासाठी कायदा करावा. तो न केल्यास सर्वत्र वैध मार्गाने तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी बदलापूर (ठाणे) येथील संत आणि श्री रामदास मिशनचे (युनिव्हर्सल सोसायटी) राष्ट्रीय अध्यक्ष प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने १ नोव्हेंबरला मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस्.बी.) मंदिर ट्रस्ट (मुंबई)चे विश्वस्त श्री. प्रवीण कानविंदे, केरळीय क्षेत्र परिपालन ट्रस्ट मुंबईचे विश्वस्त श्री. पी.पी.एम्. नायर, पनवेल येथील जैन मंदिर संघाचे विश्वस्त श्री. मोतीलाल जैन, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
प.पू. कृष्णानंद सरस्वती पुढे म्हणाले की,
१. शबरीमला मंदिरात मोठ्या प्रमाणात अर्पण येते. त्यामुळे हे मंदिर सरकारला पाहिजे; परंतु ज्या मंदिरात उत्पन्न मिळत नाही, त्या मंदिरात दिवा लावायलाही सरकार सिद्ध नाही.
२. स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी मला तुम्हाला विनंती करावी लागत आहे, ही माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. साधू असूनही तुमच्यामध्ये येऊन हे सांगावे लागत आहे.
३. देशात ईश्वर, आई-वडील, समाज आदींवरील विश्वास तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. हिंदूंच्या प्रथा-परंपरा सांभाळणे सरकारचे कर्तव्य आहे.
४. काही महिलांना पोलिसांच्या पोशाखात मंदिरात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तो लाखो महिला भाविकांनी हाणून पाडला. या मुसलमान आणि ख्रिस्ती महिला होत्या. त्यांना पैसे देऊन आणले होते.
५. हिंदु-मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यात मारामारी व्हावी; म्हणून जाणीवपूर्वक हे केले गेले. तेथील मुख्यमंत्री विजयन् यांनी ‘कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही करणार’, असे सांगितले; पण सर्वोच्च न्यायालयाचे इतर अनेक निर्णय लागू करायचे शेष आहे, तिकडे ते लक्ष देत नाहीत.
दानपेटीत अर्पण न करता त्यात मंदिर सरकारीकरण रहित करण्याविषयीच्या चिठ्ठ्या टाकण्याचे आवाहन करणार !
प.पू. कृष्णानंद सरस्वती म्हणाले, ‘‘या आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही सरकारीकरण केलेल्या मंदिरांच्या दानपेटीत अर्पण न करता, त्या जागी ‘मंदिर सरकारीकरण रहित करा आणि हिंदु परंपरांचे रक्षण करा !’ असे लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकण्याचे आवाहन करू.’’
संतांशी आणि पत्रकार परिषदेत कसे वागायचे, याचे ताळतंत्र नसलेले इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे पत्रकार !
या पत्रकार परिषदेत उपस्थित इंग्रजी वृत्तवाहिन्यांचे १ पुरुष आणि १ महिला पत्रकार प्रश्नांची सरबत्ती करत होतेे; परंतु प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती आणि श्री. नरेंद्र सुर्वे हे उत्तर द्यायला लागल्यावर त्यांना बोलू न देता पुढचा प्रश्न विचारत होते. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांचे बोलणे मध्येमध्ये तोडत होते. (असे पत्रकार जनतेला दिशा काय देणार ? – संपादक) त्यामुळे काही वेळ पत्रकार परिषदेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.