नांदेड येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमींच्या मागण्या !
नांदेड : भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात चिनी फटाके आणि दिवे यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी मातीच्या पणत्या खरेदी करून स्वदेशीचा पुरस्कार करावा. प्रशासनाने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशा मागण्या येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्मप्रेमी नागरिकांनी केल्या. आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे श्री. गणेश कोकुलवार, बजरंग दलाचे श्री. अक्षय पाटील, योग वेदांत सेवा समितीचे श्री. शिवकैलास कुंटूरकर, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते असे २५ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आंदोलनात महिलांची उपस्थिती अधिक होती.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने केलेल्या एकमुखी मागण्या
१. प्रयाग कुंभमेळ्याला जाणार्यांवरील रेल्वे तिकिटावर अतिरिक्त अधिभार लावायचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय अत्यंत अन्यायकारी आणि भेदभाव करणारा असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा असल्याने हा अधिभार त्वरित रहित करण्यात यावा.
२. अनैतिक आणि अवैध धंदे, जुगार, अमली पदार्थ, मानवी तस्करी आदी अनेक गोष्टींवर प्रतिबंध आणण्यासाठी ‘ऑनलाइन’ वेश्या व्यवसाय चालवणार्या संकेतस्थळांवर बंदी आणावी.
३. चर्चमध्ये होणारे लैंगिक शोषण आणि बलात्कार पहाता देशभरातील चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करावी.
विशेष
हिंदु राष्ट्राच्या मागणीला जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांचे अनुमोदन !
आंदोलनाच्या माध्यमातून हिंदु समाजाच्या मागण्या आणि राष्ट्रविघातक समस्या समाजापर्यंत पोहोचवणे हे कौतुकास्पद आणि आवश्यक उपक्रम असल्याची प्रतिक्रिया आंदोलनस्थळी आलेल्या अन्य जिज्ञासू आणि धर्मप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली. तसेच ‘हिंदु राष्ट्र आलेच पाहिजे’, या मागणीलाही अनुमोदन दिले.